
रायगड, 5 डिसेंबर (हिं.स.)। रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२ व्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला गुरुवारी पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या थाटात सुरुवात झाली. सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक, अभिनेते सुनील तावडे आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले.
राज्यभरातून आलेल्या १०० हून अधिक एकांकिकांमधून निवडलेल्या उत्कृष्ट २५ एकांकिकांची महाफेरी ५ ते ७ डिसेंबरदरम्यान रंगणार असून पनवेलकर नाट्यरसिकांसाठी ही मोठी कलात्मक मेजवानी ठरणार आहे. उद्घाटन सोहळ्याला युवा ते ज्येष्ठ रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नाट्यमहोत्सवाचा पहिला दिवस दिमाखदार केला.
सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पनवेल शाखा उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी सभागृहनेते जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, राजू सोनी, महिला मोर्चा व युवा मोर्चाचे पदाधिकारी, रंगकर्मी व समाजातील मान्यवर उपस्थित होते.
पहिल्या दिवशी वसंतराव नाईक विज्ञान संस्थेची ‘वि. प्र’, मुलुंड वाणिज्य विद्यालयाची ‘स्वातंत्र्य सौभाग्य’, मिथक मुंबईची ‘कारण काय’, एकदम कडक नाट्य संस्था भाईंदरची ‘बकेट लिस्ट’, वझे विद्यालयाची ‘द गर्दभ’, साताराच्या महाविद्यालयाची ‘सोयरीक’, नाट्यस्पर्श व भवन्सची ‘प्रतीक्षायान’, इस्लामपूर महाविद्यालयाची ‘हाफ वे’, कलादर्पण पनवेलची ‘आख्यान-ए-झुरळ’ आणि रेवन एंटरटेनमेंट पुण्याची ‘सांग रहियो’ या १० एकांकिकांचे सादरीकरण झाले.
स्पर्धेचा पारितोषिक समारंभ ७ डिसेंबर रोजी होणार असून विजेत्या एकांकिकेला १ लाख रुपये आणि मानाचा ‘अटल करंडक’ प्रदान केला जाणार आहे. तसेच ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि अभिनेते–निर्माते सुनील बर्वे यांना “गौरव रंगभूमीचा” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
नाट्यचळवळीची परंपरा जपणे, नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे हा ‘अटल करंडक’चा मुख्य हेतू असल्याचे स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके