
रायगड, 5 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर रायगड जिल्हा आणखी ठळकपणे झळकणार आहे. मदरसन ग्रूपच्या ‘समवर्धन मदरसन हामाक्युरेक्स इंजिनिअर्ड लॉजिस्टिक्स लिमिटेड’ (SAMRAX) ने अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडच्या (APSEZ) दिघी पोर्ट लिमिटेडशी (DPL) महत्त्वपूर्ण भागीदारी करार जाहीर केला आहे. या करारानुसार दिघी पोर्टवर अत्याधुनिक रो-रो (Roll-on/Roll-off) टर्मिनल उभारण्यात येणार असून येत्या काळात या बंदरावरून दरवर्षी तब्बल दोन लाख वाहनांची निर्यात केली जाणार आहे.
मुंबई–पुणे ऑटो बेल्टमधील प्रमुख वाहन उत्पादकांसाठी दिघी पोर्ट हे आता सर्वात जवळचे आणि कार्यक्षम निर्यात केंद्र ठरेल. या भागीदारीमुळे महाराष्ट्रातील आणि देशातील ऑटोमोबाईल उद्योगासाठी एक नवे लॉजिस्टिक हब उभे राहत असून, ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला मोठे बळ मिळणार आहे.
या भागीदारीबद्दल बोलताना APSEZ चे सीईओ अश्वनी गुप्ता म्हणाले, “दिघी पोर्टवरील रो-रो सुविधा भारताच्या ऑटोमोबाईल लॉजिस्टिक्स क्षेत्रात क्रांती घडवेल. मदरसनच्या अनुभवामुळे आणि आमच्या पायाभूत सुविधांमुळे वाहन निर्यात अधिक वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम होईल.” मदरसन ग्रुपचे उपाध्यक्ष लक्ष वामन सेहगल यांनी सांगितले, “ही भागीदारी आमच्या OEM भागीदारांसाठी खर्च कमी करणारी, उच्च-कार्यक्षमता देणारी प्रणाली निर्माण करेल. वाहन पुरवठा साखळी अधिक सक्षम होणार आहे.” नवीन टर्मिनलमध्ये एकाच ठिकाणी सर्व सेवा—यार्ड व्यवस्थापन, वाहन तपासणी, चार्जिंग, स्टोरेज ते जहाजावर लोडिंग—उपलब्ध असतील. AI-आधारित यार्ड ऑप्टिमायझेशन, EV रेडी लॉजिस्टिक हब, 360-डिग्री कार्गो ट्रॅकिंग आणि वर्षभर कार्यरत रो-रो जेट्टी ही या सुविधेची वैशिष्ट्ये असतील.
पश्चिम किनाऱ्यावर धोरणात्मक स्थिती, उत्कृष्ट रस्ते संपर्क आणि सुरक्षित जलवाहतूक यामुळे दिघी पोर्ट महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणारे लॉजिस्टिक हब बनण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पामुळे रायगड जिल्हा येत्या काही वर्षांत देशातील प्रमुख ऑटोमोबाईल निर्यात केंद्र म्हणून उदयास येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके