सोलापूरात जिल्हास्तर युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन
सोलापूर, 5 डिसेंबर (हिं.स.)।क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दिनांक 09 व 10 डिसेंबर 2025 रोजी करण्यात
सोलापूरात जिल्हास्तर युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन


सोलापूर, 5 डिसेंबर (हिं.स.)।क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दिनांक 09 व 10 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. राज्यात 2025-26 या वर्षात जिल्हा ते राष्ट्रीय स्तरापर्यंत युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून युवकांचा सर्वांगीण विकास, संस्कृती व परंपरेचे जतन, सुप्त गुणांना वाव देणे तसेच राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन 12 ते 16 जानेवारी 2026 दरम्यान होणार असून यावर्षी विज्ञान व तंत्रज्ञान नवोपक्रम या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम होणार आहे. यात 15 ते 29 वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार असून प्राविण्य प्राप्त स्पर्धकांना शासनाकडून पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रथम क्रमांक विजेत्यांची विभागस्तरावर निवड केली जाणार आहे. सहभागींच्या वयाची गणना 12 जानेवारी 2026 रोजी केली जाणार असून जन्मतारीख पुरावा म्हणून जन्म दाखला व सोलापूर जिल्ह्याचा रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यातील संगीत महाविद्यालय, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालये, समाजकार्य, इंजिनिअरिंग, वैद्यकीय, कृषी महाविद्यालये तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांतील विद्यार्थी व युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande