रायगड - आंबेवाडीतील अंडरपासची मागणी चिघळली; जनआंदोलनानंतर प्रशासनाला जाग
रायगड, 6 डिसेंबर (हिं.स.)। आंबेवाडी वरसगाव (मुंबई–गोवा महामार्ग) : आंबेवाडी वरसगाव बाजारपेठेतील उड्डाण पुलाच्या कामामुळे नागरिक व व्यापाऱ्यांसाठी कोणताही प्रवेशमार्ग न ठेवल्याने तीव्र नाराजी उसळली आहे. यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी शुक्रवार, ५
आंबेवाडीतील अंडरपासची मागणी चिघळली; जनआंदोलनानंतर प्रशासनाला जाग


रायगड, 6 डिसेंबर (हिं.स.)। आंबेवाडी वरसगाव (मुंबई–गोवा महामार्ग) : आंबेवाडी वरसगाव बाजारपेठेतील उड्डाण पुलाच्या कामामुळे नागरिक व व्यापाऱ्यांसाठी कोणताही प्रवेशमार्ग न ठेवल्याने तीव्र नाराजी उसळली आहे. यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी दोन तास दुकानबंदी करत दोन अंडरपास रस्ते निर्माण करण्याच्या मागणीसाठी जनआक्रोश आंदोलन छेडले. परिस्थिती तणावपूर्ण असताना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी मध्यस्ती करून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यास यश मिळवले.

घटनास्थळी मंत्री गोगावले यांनी एनएचएआयचे अधिकारी निखिल कुमार यांच्याशी चर्चा करून व्यापाऱ्यांच्या अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले. “आम्ही काम थांबवण्याच्या भूमिकेत नाही; पण स्थानिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी अंडरपास गरजेचा आहे. संबंधित जागा शिल्लक ठेवून पुढील काम सुरू ठेवा. आवश्यकता असल्यास मी स्वतः नितीन गडकरी साहेबांशी चर्चा करेन. यासाठी पंधरा दिवसांची मुदत द्या,” असे आश्वासन मंत्री गोगावले यांनी दिले.

आंबेवाडी बाजारपेठेत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, जेष्ठ नागरिक सभागृह, अंगणवाड्या, मंदिरे अशा महत्त्वाच्या सुविधा असल्याने अंडरपास नसल्यास नागरिकांना मोठा वळसा घ्यावा लागणार आहे. तसेच स्मशानभूमी, दुकाने व इतर आवश्यक ठिकाणी जाण्यासाठीही अंडरपास अत्यावश्यक असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले. प्रस्तावित कामाबाबत नागरिकांना विश्वासात न घेता जनसुनावणी न झाल्याचीही रहिवाशांनी खंत व्यक्त केली.

आंदोलनात संजय कुर्ले, गणेश शिंदे, महेंद्र वाचकवडे, चंद्रकांत लोखंडे, उदय खामकर आदींसह व्यापारी, रिक्षाचालक, टेम्पो चालक व रहिवाशांची मोठी उपस्थिती होती. मुंबई–गोवा महामार्गाचे काम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची नवीन डेडलाईन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केली असली तरी आंबेवाडीतील अंडरपासचा प्रश्न १५ दिवसांत मार्गी लागला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande