
पुणे, 6 डिसेंबर (हिं.स.)। सध्याच्या धकाधकीच्या काळात ॲलोपॅथीबरोबरच प्रतिबंधात्मक उपचार, शरीरासह मनावरही उपचार करणाऱ्या विविध उपचार थेरपींची गरज पडते. हीच गरज आरोग्य विभागाचे औंध येथील जिल्हा आयुष रुग्णालय पूर्ण करत आहे. येथे आयुष, होमिओपॅथी व निसर्गोपचाराच्या माध्यमातून नागरिकांना पारंपरिक पद्धतीचे उपचार पुरवत आहे. या उपचारांना दिवसेंदिवस प्रतिसादही वाढत आहे.
शारीरिक व्याधींवर ॲलोपॅथीची औषधे तत्काळ आराम मिळवून देतात. मात्र, काही व्याधी, आजार अशा असतात की त्या केवळ ॲलोपॅथीच्या औषधोपचारांनी तात्पुरत्या बऱ्या होत असल्या तरी मुळातून बऱ्या होत नाहीत.
त्यासाठी त्यांना ॲलोपॅथीसह आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अशा संयुक्त व परंपरागत उपचारपद्धतीचीदेखील (इंटिग्रेटेड मेडिसिन) गरज पडते, तर मानसिक ताण कमी करणारे नैसर्गिक उपचार व मन-शरीर आधारित थेरपींचेही उपचार औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील राज्यातील पहिले आयुष रुग्णालय पुरवत आहे.
खासगी रुग्णालयास तोडीस तोड वाटावे, असे हे सरकारी रुग्णालय २५ मार्च २०२४ मध्ये प्रशस्त इमारतीमध्ये कार्यान्वित झाले असून, येथे दररोज सकाळी योगाचे सत्र होतात. बाह्यरुग्ण विभागात आलेल्या रुग्णांची समस्या, उपचारांचा इतिहास, जीवनशैली यावरून मूल्यमापन केले जाते. नंतर प्रकृती पाहून त्यांना आयुष, युनानी, होमिओपॅथी की प्राकृतिक उपचार (नॅच्युरोपॅथी) द्यायचे हे ठरवले जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु