
परभणी, 6 डिसेंबर (हिं.स.)।
‘तुझा ऊस कारखान्यास जाऊ देणार नाही, तू ऊस कसा कारखान्यास आणतोस ते मी बघतोच’ असे म्हणत पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील ऊस उत्पादकास मारहाण करीत धमकविणार्या विकास घुंबरे यांच्यासह अन्य तीघा साथीदारांविरुध्द पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघाळा येथील ऊस उत्पादक शेतकरी सुशील नागोराव घुंबरे यांनी पाथरी पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल केली. या तक्रारीत, वाघाळा येथील देवस्थानची पडीक जमीन काही वर्षापूर्वी ग्रामस्थांनी बैठक घेऊन वहितीकरीता आपणास तोंडी कराराद्वारे दिली. त्या जमीनीत आपण ऊसाची लागवड केली. त्यापैकी काही क्षेत्रावरील ऊस आपण कारखान्यास देणार होतो. परंतु, आपण व आपले पुतणे कर्तिक किरण घुंबरे हे शेत जमीनीत काम करीत असतांना विकास रतनराव घुंबरे, ज्ञानोबा सर्जेराव घुंबरे, स्वराज प्रल्हादराव घुंबरे, प्रल्हाद परमेश्वर घुंबरे हे चौघे शेतात आले. व ही जमीन तुमची नाही, मारोती देवस्थानची आहे, आम्ही हा ऊस कारखान्यास जावू देणार नाही, नवीन ऊस ट्रॅक्टर घालून मोडून टाकू, अशी धमकी दिली व आपल्या गालावर जोरात चापट मारली. ऊस आम्ही फुंकून टाकू, तुम्ही ऊस तोडून कारखान्यास नेला तर जिवंतसुध्दा ठेवणार नाही, असे धमकावल्याचे तक्रारीत म्हटले. घुंबरे यांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार करुन गावातील अनेकांना या ग्रुपशी जोडून त्या माध्यमातून इतरांना एकत्र करुन चिथावणी देत असल्याचेही तक्रारीत नमूद केले.
दरम्यान, पाथरी पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे त्या चौघांविरोधात भादंवि 115 (2), 351 (2), 3 (5) कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis