
कोल्हापूर, 6 डिसेंबर (हिं.स.)।
नेत्यांच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना ताकद द्या असे आदेश शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ना.मा.श्री. एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. वातावरण चांगले आहे म्हणून गाफील राहू नका, एकसंघ रहा आणि महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना दिल्या कोल्हापूर महानगरपलिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजर्षी शाहू स्मारक भवन येथे शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
मेळाव्यात बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले कोणत्याही परिस्थिती महानगरपालिकेवर भगवा फडकविण्याची जबाबदार पदाधिकारी आणि शिवसैनिकांचीच आहे. महानगरपालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे आहे आणि ते पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आताच्या निवडणुकीत शिवसैनिकांना मिळणार आहे.
झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसह महायुतीला घवघवीत यश मिळाले. या यशाचे सर्व श्रेय शिवसैनिकांचे आणि महायुतीसाठी रात्रदिवस झटलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा सर्व्हे पाहता मतदारांचा कौल हा शिवसेनेच्या बाजूने आहे. शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे हि भावना सर्वांचीच आहे. माझ्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाच रान केले आता हि निवडणूक कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ देणे माझं कर्तव्य आहे. कोणावरही अन्याय होणार नाही हि भूमिका असली तर सक्षम उमेदवार देणे काळाची गरज आहे. विरोधकांकडून फेक नेरेटिव्ह सेट केले जातील पण त्याला आपण विकास कामातून आणि शिवसेनेच्या विकासाच्या व्हिजनने उत्तर देवून. पक्षाच्या वतीने उमेदवारीसाठी सर्व्हे केला जाणार आहे. त्यामध्ये आपले नांव मतदारांच्या पसंतीस पडले पाहिजे. त्यामुळे कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले शहर विकासाच्या दृष्टीने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. रस्ते, पाणी अशा मुलभूत सोई सुविधा देण्यासाठी शिवसेनाच पर्याय आहे, अशा पद्धतीचे काम सुरु आहे. पण पक्ष जो उमेदवार देईल त्याच्याच पाठीशी ठाम उभे राहणे आणि एकनिष्ठपणे धनुष्यबाणाचा प्रचार करणे ही आपली जबाबदारी आहे. महत्वाचे म्हणजे यापूर्वी महानगरपालिकेत सत्तेतील प्रमुख आणि विरोधी पक्षातील प्रमुख हे दोघेही शिवसेनेत आहेत. त्यांचा महापालिकेतील अनुभव आता शिवसेनेकडे आहे. त्यावरून शिवसेनेची ताकत समजून येईल, असेही प्रतिपादन केले.
शिवसेना जिल्हा संघटक सत्यजित उर्फ नाना कदम म्हणाले, प्रत्येक वेळी महापालिकेत शिवसेनेचे ४ ५ नगरसेवक असे टोमणे मारले जात होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. विधानसभेत आपण बाजी मारली. तीच उर्जा घेवून महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे. युती झाली तर प्रामाणिकपणे काम करुया.
या मेळाव्यास जिल्हा संघटक विनायक साळोखे, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, किशोर घाटगे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, राहुल चव्हाण, रणजीत मंडलिक, दीपक चव्हाण, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, रमेश पुरेकर, प्रकाश नाईकनवरे, संभाजी जाधव, अजित मोरे, अरविंद मेढे, दुर्गेश लिंग्रस, अजय इंगवले, अस्कीन आजरेकर, नेपोलियन सोनुले, प्रसाद चव्हाण, पियुष चव्हाण, आदर्श जाधव, कृष्णा लोंढे, प्रशांत साळुंखे, अश्विन शेळके, महिला आघाडीच्या मंगलताई साळोखे, पवित्र रांगणेकर, अमरजा पाटील आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar