
नाशिक, 6 डिसेंबर (हिं.स.)।
- सिंहस्थासाठी होणाऱ्या विकासकामांची गती वाढावी आणि निधीअभावी कोणतेही काम रखडू नये, यासाठी शासनाने आता ७१७ कोटींचा निधी वितरित केला आहे. यापूर्वीच २८३ कोटी रुपये वितरित केले होते. असे आतापर्यंत सिंहस्थाच्या कामांसाठी प्राधिकरणाला १ हजार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.
नगरपालिका निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये येऊन तब्बल ५६५७
कोटींच्या कामांचे भूमिपूजन केले होते. या कामांसाठी १००० कोटी रुपयांची शासनाने तरतूद केली होती. त्यापैकी २८३ कोटींचा निधी हा १५ ऑक्टोबरला वितरित केला होता. आता ७१७ कोटींचे वितरण केले आहे. या पहिल्या टप्प्यातील कामांच्या मंजूर आराखड्यातील कामांसाठीच हे पैसे खर्च करता येणार आहेत, ते प्रशासकीय स्तरावर गरजेनुसार इतरत्र वळवता येणार नाहीत, तशी अटही वितरित करण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आली आहे.
..या कामांचा समावेश
स्नान घाटांची कामे, मनपाद्वारे शहरांतर्गत रस्ते, बाह्य रस्ते. एमआयडीसी अंतर्गत होणारे रस्ते, एनएचएआयद्वारे होणारे रस्ते, पूल. त्र्यंबकेश्वरमधील तीर्थक्षेत्र विकासांतर्गत होणारी कामे वगळून इतर कामे.
चौकट
टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त
जी कामे सिंहस्थासाठी मंजूर झालेली आहेत. त्या कामांना कुठेही निधीची अडचण येऊ नये. रस्ते, घाट, मनपाची काही कामे आहेत, त्यांना हा निधी देण्यात आला आहे. टप्याटप्याने निधी प्राप्त होत असून पहिल्या टप्यातील १००० कोटींपैकी ७१७ कोटी आता मिळाले. यापूर्वी २८३ कोटी दिले होते.
शेखर सिंह, मेळा आयुक्त
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV