
पुणे, 6 डिसेंबर, (हिं.स.)। शहरातील बेकायदा अभ्यासकांवर कारवाई करण्याचा आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी बांधकाम विभागासह अतिक्रमण विभागाला दिले.अतिरिक्त आयुक्तांनी महापालिकेतील विविध विभागांची बैठक घेतली.त्यामध्ये शहरातील अभ्यासिकांचा आढावा घेण्यात आला. अतिक्रमण विभागाचे प्रमुख सोमनाथ बनकर, परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त निखिल मोरे, कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप आव्हाड, कार्यकारी अभियंता सुरेंद्र कर्पे, मुख्य सुरक्षा अधिकारी रमेश शेलार, कर आकारणी व कर संकलन विभागाचे अधिकारी, यावेळी उपस्थित होते.
बैठकीत अतिरिक्त आयुक्तांनी बेकायदा अभ्यासिकांवर कारवाईचे आदेश बांधकाम विभागासह अतिक्रमण विभागाला दिले. कारवाई करण्यासाठी पुढील १० ते १५ दिवसांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त बैठकीचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच, याचा आढावा घेण्यासाठी १७ डिसेंबर रोजी पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु