पोलिसांविरुद्धच्या तक्रारींसाठी अमरावतीत 'विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण' कार्यान्वित
अमरावती, 6 डिसेंबर (हिं.स.) पोलीस विभागाकडून अधिकारांचा गैरवापर किंवा गैरवर्तन झाल्यास नागरिकांना निष्पक्ष चौकशीसाठी स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी अमरावती शहरात विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण (DPCA) स्थापन करण्यात आले आहे. सर्वोच्
पोलिसांविरुद्धच्या तक्रारींसाठी अमरावतीत 'विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण' कार्यान्वित


अमरावती, 6 डिसेंबर (हिं.स.)

पोलीस विभागाकडून अधिकारांचा गैरवापर किंवा गैरवर्तन झाल्यास नागरिकांना निष्पक्ष चौकशीसाठी स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी अमरावती शहरात विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण (DPCA) स्थापन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने हे प्राधिकरण स्थापन केले असून या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उषा ठाकरे या कार्यरत आहे. तसेच, पी. टी. पाटील (निवृत्त पोलीस अधीक्षक) हे सदस्य आणि पंकज निखार हे नागरी सदस्य म्हणून आपापली जबाबदारी सांभाळत आहेत. सामान्य नागरिकांना पोलीस विभागाविरुध्द काही तक्रार असल्यास याठिकाणी त्यासंदर्भात दाद मागावी, असे आवाहन विभागीय पोलीस तक्रार प्राधिकणाचे कार्यालय प्रमुख तथा पोलीस उप आयुक्त रमेश धुमाळ यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, अमरावती विभाग, अमरावतीचे कार्यालय फेब्रुवारी 2025 पासून अमरावती येथे कार्यान्वित झाले असून कार्यालयाचा पत्ता: विशेष आय.जी.पी. बंगला ते शासकीय विश्राम गृह रोड, गुलमोहर अपार्टमेंटचे बाजूला, कॅम्प, अमरावती-४४४६०२ असा आहे. नागरिकांच्या संपर्कासाठी दूरध्वनी- ०७२१/२९९०३०६ तर ई-मेल: dpca.amt@mahapolice.gov.in याप्रमाणे आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या (प्रकाश सिंग प्रकरण २००६) आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने अमरावती येथे उपरोक्तप्रमाणे प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून पोलिसांना कायद्याने दिलेल्या अधिकारांचा गैरवापर किंवा त्यांच्याकडून झालेल्या गैरवर्तनाबाबत नागरिकांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करणे हा मुख्य उद्देश आहे. हे प्राधिकरण वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपर्यंतच्या (Senior Police Inspector) दर्जाच्या पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुध्दच्या तक्रारींची चौकशी करण्याचे अधिकार या प्राधिकरणास आहे. तसेच पोलीस उप-अधीक्षक किंवा त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांविरुध्दच्या तक्रारी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे (मुंबई) केल्या जातात.

पोलीस कोठडीतील मृत्यू किंवा गंभीर दुखापत, बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न, विहीत कार्यपध्दती न अनुसरता केलेली अटक, भ्रष्टाचार, खंडणी उकळणे, जमीन किंवा घर बळकावणे, इतर गंभीर कायदेशीर उल्लंघन किंवा कायदेशीर अधिकाराचा दुरुपयोग आदी तक्रारींवर व गंभीर गैरवर्तन संदर्भात प्राधिकरणाला चौकशी करण्याचे अधिकार आहे.

*तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया :* तक्रार लेखी स्वरुपात (मराठी, हिंदी किंवा इंग्रजीमध्ये) साध्या कागदावर किंवा प्राधिकरणाच्या वेबसाईटवर ऑनलाईन स्वरुपात दाखल करता येते. तक्रार दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. प्राधिकरण तक्रारींची नोंद घेते, त्याची चौकशी करते तसेच चौकशीत तथ्य आढळल्यास, प्राधिकरण संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस शासनाकडे करते.

महाराष्ट्रातील विभागीय प्राधिकरणे : अमरावतीसह पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर आणि कोकण विभाग (नवी मुंबई) येथे एकूण सहा विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणे कार्यरत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande