
मुंबई, 6 डिसेंबर, (हिं.स.)। राज्यभर येत्या 13 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकअदालतीमध्ये ई-चलान प्रकरणांची तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे स्पष्टीकरण अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), मुंबई यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. तरी याबाबत नागरिकांनी अफवांना बळी पडू नये.
सन 2021 पासून प्रलंबित ई-चलान प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी वाहतूक विभागाकडून महाराष्ट्र राज्य विधी आणि सेवा प्राधिकरणाच्या मंजुरीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र आगामी लोकअदालतीत वाहतूक विभागाकडून कोणतीही ई-चलान प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार नाहीत, असे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, काही यूट्यूब, इंस्टाग्राम तसेच अन्य सामाजिक माध्यमांवर 13 डिसेंबरच्या लोकअदालतीत ई-चलान दंडात सवलत मिळणार असल्याची चुकीची माहिती पसरवली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. अशा अफवांमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याने पोलीस विभागाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
वाहतूक विभागाचे नागरिकांना आवाहन
ई-चलान तडजोड किंवा दंडात सवलत याबाबत सामाजिक माध्यमांवरील अपप्रचारावर विश्वास ठेऊ नये. कोणत्याही अनधिकृत लिंकद्वारे ई-चलानची रक्कम भरणा करू नये. जर एखाद्या नागरिकाचे प्रकरण स्थानिक जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाने तडजोडीसाठी ठेवले असल्यास, संबंधित न्यायालय किंवा स्थानिक वाहतूक पोलीसांशी थेट संपर्क साधावा, असे पोलीस अधीक्षक (मुख्यालय) सुनील भारव्दाज यांनी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाच्या वतीने कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर