
अमरावती, 6 डिसेंबर (हिं.स.)
यावर्षी खरीपातील सोयाबीन पुर्णपणे शेतकऱ्यांच्या हातातून गेले. अनेक शेतकऱ्यांची तर अतिपावसाने तूर सुध्दा गेली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या शेतात तूर आहे. अशा शेतकऱ्यांच्या सर्व आशा, अपेक्षा आता तुरीच्या उत्पादनावरच अवलंबून आहे. सद्या तुरीची स्थिती चांगली आहे. मात्र अनेक भागात रानडूक्करांच्या त्रासामुळे शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहे. रानडुक्कर रात्री, मध्यरात्री शेतात जावून उभ्या तुरीचे शेकडो झाड अक्षरश: जमिनदोस्त करत आहेत. त्यामुळे रानडुकरांपासून तुरीच्या रखवालदारीसाठी शेतकरी रात्री, बेरात्री कुडकुडत्या थंडीत शेतात जागरणासाठी जाग आहेत.
निसर्गाच्या अवकृपेमुळे यावर्षी खरीपातील सोयाबिनला पुर्णपणे तर त्यापाठोपाठ कपाशीला फटका बसला आहे. जिल्ह्यातील खरीपाच्या या दोन्ही मुख्य पिकांकडून शेतकऱ्यांना यंदा फायदा होण्याऐवजी अनेक शेतकऱ्यांचा तर मशागत खर्चसुध्दा वसूल झाला नाही. कारण सोयाबीन पिकले नाही जे काही पिकले त्याला बाजारात मातीमोल भाव मिळाला. बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विकल्यानंतर सोयाबिनची शासकिय खरेदी सुरू झाली. अशावेळी त्या सोयाबिनची शासकिय खरेदी म्हणजे केवळ शासनाचे समाधान अशीच स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आता अपेक्षा तुरीवरच आहे. कारण तूर आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. महिनाभरानंतर तूर काढणीला येणार आहे. या महिनाभरात निसर्ग काय करणार हे शेतकऱ्यांना माहीत नाही, मात्र आता उभ्या तुरीवर रानडुकरांनी हल्लाबोल चढवला आहे. दरदिवशी रात्री सात वाजतापासून डूकरांचा हैदोस सुरू होतो. शेतकरी शेतात हजर नसेल तर अवघ्या काही तासात शेकडो, हजारो झाड डुकरांचा कळप जमिनदोस्त करुन टाकतात. त्यामुळे झाड मोडतात व ते झाडं आगामी दोन ते चार दिवसात मरुन जातात. त्यामुळे हाताशी आलेल्या तुरीच्या पिकाचे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत होत्याचे नव्हते होत आहे. सद्या अनेक भागातील शेतकऱ्यांसमोर डुकरांपासून तूर वाचवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. शेतकरी मागील अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे त्रस्त झालेले आहेत. वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होतच आहे, सोबतच अनेकदा शेतकऱ्यांवर हे वन्यप्राणी शेतात जावून हल्ला करतात. त्यामुळे शेताला कुंपण अतिआवश्यक आहे. शेतकऱ्याला मागील काही वर्षांपासून होणारे उत्पादन लक्षात घेता दोनवेळी जेवण करुन संसराचा गाडा हाकणे अवघड होत आहे, अशावेळी तार कुंपणासाठी शेतकरी कशी तरतूद करणार आहे. अशावेळी शासनाने शेतकऱ्याला तार कुंपणासाठी अनुदान देणे किंवा एखादी प्रभावी योजना राबविल्यास शेतकऱ्याची वन्यप्राण्यांपासून सुटका होईल मात्र या इतक्या महत्वाच्या प्रश्नावर शासन काही करायला तयार नाही, या संदर्भात आजवर राजकिय नेत्यांनी केलेल्या घोषणा या हवेतच विरल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी