
पुणे, 6 डिसेंबर, (हिं.स.)। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या मालकीच्या अमेडिया एंटरप्राइझेस कंपनीने केलेल्या मुंढव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात सध्या पोलिस कोठडीत असलेल्या शीतल तेजवानीच्या कोरेगाव पार्कमधील घराची आर्थिक गुन्हे शाखेकडून झडती घेण्यात आली. या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
मुंढवा येथील महार वतनाच्या ४३ एकर शासकीय जमीन तीनशे कोटी रुपयांना विक्रीस काढल्याचा गैरव्यवहार नुकताच उघडकीस आला. या प्रकरणात खडक पोलिस ठाण्यात तेजवानीसह नऊ जणांवर गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी मुख्य आरोपी शीतल तेजवानीला (वय ४४ वर्षे, मूळ रा. नरिमन पॉइंट, मुंबई, सध्या रा. लेन नंबर ७, कोरेगाव पार्क) बुधवारी अटक केली होती. न्यायालयाने तिला ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तिच्या घरी पथकाने छापा टाकून कागदपत्रे जप्त केली. जप्त केलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु