समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली - डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, 6 डिसेंबर (हिं.स.) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम शनिवार, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११
नीलम गोऱ्हे आंबेडकर अभिवादन


मुंबई, 6 डिसेंबर (हिं.स.) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम शनिवार, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बाबासाहेबांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन करताना सांगितले की, “बाबासाहेब हे ज्ञानाच्या अथांग सागरासारखे आहेत. त्यांनी दिलेली मूल्ये, विचार आणि संविधानिक तत्त्वे ही प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत. समानता, न्याय आणि मानवाधिकारांसाठी त्यांचे योगदान अनमोल आहे.”

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही विधिमंडळ मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. संविधान निर्मितीत बाबासाहेबांचे प्रचंड योगदान आहे. केंद्र सरकारने हे वर्ष स्मरणवर्ष म्हणून घोषित केले असून त्यांच्या स्मारकांचे संवर्धन व उन्नतीसाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहेत.”

त्या पुढे म्हणाल्या, “आज नागपूर येथील दीक्षाभूमीवर हजारो नागरिकांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. मुंबईतील चैत्यभूमीवर जनतेचा महासागर उसळलेला आहे. मुंबई महानगरपालिकेने उत्कृष्ट व्यवस्था केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहून वंदन केले. पुढील वर्षापर्यंत बाबासाहेबांच्या सर्व स्मारकांचे संपूर्ण नूतनीकरण होईल, असे सरकारने जाहीर केले आहे.”

“गेल्या अधिवेशनात आम्ही राज्यघटनेवर विशेष चर्चा केली होती. महिलांना मतदानाचा हक्क, हिंदू कोड बिलासाठी केलेले बाबासाहेबांचे अप्रतिम कार्य—यामुळे भारतीय स्त्रिया व संपूर्ण समाज सक्षम झाला. म्हणूनच बाबासाहेब हे ‘भारतरत्न’ आहेतच पण ते सर्वांचे सर्वमान्य नेते आहेत,” असेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

कार्यक्रमास स्वाती ताडफळे (अवर सचिव, नियंत्रण शाखा), विनोद राठोड (अवर सचिव, समिती शाखा), नेहा काळे (कक्ष अधिकारी, विशेषाधिकार शाखा) तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande