
पुणे, 6 डिसेंबर, (हिं.स.)। प्रवाशांना विमानतळावर डीजीसीएने बदललेल्या नियमानंतर इंडिगोचं वेळापत्रक कोलमडलं असून यामुळे हजारो विमान उड्डाणं रद्द करण्याची वेळ आलीय. विमानतळांवर प्रवाशांना ताटकळत बसावं लागत आहे. विमान उड्डाणात कामाच्या वेळेची मर्यादा घातल्यानं वैमानिक उपलब्ध नसल्यानं इंडिगो एअरलाइन्सची सेवा जवळपास ठप्प झाली आहे. पुण्यात आजही ४२ विमानांचं उड्डाण रद्द केलंय. यामुळे उड्डाणाचं तिकीट दर एक लाखांवर पोहोचलेत. इंडिगोच्या वेळापत्रक विस्कळीत झाल्याचा सर्वाधिक फटका पुणे विमानतळाला बसला आहे.
इंडिगोने शुक्रवारी ४६ उड्डाणं रद्द केली. त्यात दिल्ली, नागपूर, चेन्नई, कोची, बंगळुरू, रांची यासह महाराष्ट्रातील २३ उड्डाणं रद्द करण्यात आली. परराज्यातून पुण्यात येणाऱ्या विमानांचाही यात समावेश आहे. अचानक विमान उड्डाण रद्द झाल्यानं प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
इंडिगोची सेवा कोलमडल्यानंतर इतर विमान कंपन्यांच्या दरात प्रचंड वाढ झाल्याचं चित्र दिसून येतंय. पुणे नागपूर, पुणे मुंबई, मुंबई नागपूर या विमान सेवेचे तिकट ३० हजारांपेक्षा जास्त आहे. प्रवाशांची वाढती मागणी आणि कमी उड्डाणे यामुळे कंपन्यांकडून दर प्रचंड वाढवण्यात आले आहेत. एका प्रवाशानं दिलेल्या माहितीनुसार मुंबई - नागपूर प्रवासासाठी ३९ हजार रुपये मोजावे लागत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु