कोलाड–रोहा मार्गावर भीषण अपघात; दोन ठार, दोन जखमी
रायगड, 6 डिसेंबर (हिं.स.)। कोलाड–रोहा मार्गावरील संभे गावाच्या हद्दीत मोरीजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. रॉंग साइडने आलेल्या स्कुटीने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेमुळे ही दुर्
कोलाड–रोहा मार्गावर भीषण अपघात; दोन ठार, दोन जखमी


कोलाड–रोहा मार्गावर भीषण अपघात; दोन ठार, दोन जखमी


रायगड, 6 डिसेंबर (हिं.स.)। कोलाड–रोहा मार्गावरील संभे गावाच्या हद्दीत मोरीजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. रॉंग साइडने आलेल्या स्कुटीने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेमुळे ही दुर्घटना घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता दिनेश भिकू पवार (रा. विठ्ठलनगर, रातवड, ता. माणगाव) हे आपल्या ताब्यातील होंडा शाईन (क्र. MH 06 BJ 3318) मोटारसायकलवरून धाटाव-कौलाड मार्गावर प्रवास करत होते. त्याचवेळी धाटाव येथील जावीर इब्राहिम शाह (मूळ गाव – कुशीनगर, उत्तर प्रदेश) हा आपल्या स्कुटीवर (क्र. MH 06 CB 3701) प्रवासी साक्षीदाराला बसवून कोलाडकडून धाटावकडे येत होता.

संभे गावाजवळील मोरी परिसरात जावीर शाह हा रॉंग साइडने वेगात आल्याने त्याची स्कुटी समोरून येणाऱ्या दिनेश पवार यांच्या मोटारसायकलला जोरदार धडकली. अपघात इतका गंभीर होता की दिनेश पवार आणि स्कुटी चालक जावीर शाह या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेत स्कुटीवरील प्रवासी अशपाक मोहम्मद फारूख अली (रा. शक्तीनगर, कुशीनगर, उत्तर प्रदेश) आणि मोटारसायकलवरील प्रवासी मोहन पवहारी सिंग (रा. सिधावे टोला, कुशीनगर, उत्तर प्रदेश) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अचानक झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी कोलाड पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन मृतदेह पंचनामा केला आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. अपघाताची नोंद कोलाड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रसाद गोकुळे व नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई भोजकर अधिक तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande