
गडचिरोली, 8 डिसेंबर (हिं.स.)
आधार विश्व फाऊंडेशन’च्या माध्यमातून अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष गीता हिंगे यांच्या कारला मध्यरात्री नागपूर जिल्ह्यात अपघात झाला. गडचिरोलीकडे येत असताना त्यांच्या कारला समोरून भरधाव येणाऱ्या दुसऱ्या एका कारने जोरदार धडक दिली. हा अपघात रात्री 12.30 च्या सुमारास घडला.
प्राप्त माहितीनुसार, गीता हिंगे आणि त्यांचे पती सुशिल हिंगे हे नागपूर येथे असलेल्या त्यांच्या मुलांना भेटून गडचिरोलीकडे येण्यासाठी निघाले होते. नागपूर सोडल्यानंतर पाचगाव पोलीस चौकीच्या हद्दीत समोरून भरधाव वेगात येणाऱ्या महागड्या कारने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, धडक देणारे वाहन रस्ता दुभाजक तोडून हिंगे यांच्या वाहनावर येऊन धडकले. यामुळे गीता हिंगे गंभीर जखमी झाल्या तर सुशिल हिंगे आणि चालकाला किरकोळ मार लागला. त्यांना नागपूरच्या एम्स रुग्णालयात नेण्यात आले, पण गीता हिंगे यांचा मृ्त्यू झाला.
धडक देणारे वाहन एका आमदाराच्या पुत्राचे असल्याची चर्चा आहे. त्या वाहनातील लोक धुंदीत असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
राजकीय-सामाजिक क्षेत्रात सक्रिय
उच्चशिक्षित असलेल्या गीता हिंगे यांनी काही वर्ष प्राध्यापकी केली आहे. त्यानंतर त्या आधार विश्व फाउंडेशन या आपल्या संस्थेमार्फत सामाजिक कार्यात सक्रिय झाल्या. कोरोनाकाळात त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना डबे पोहोचवण्यापासून तर निराधारांवर अंत्यसंस्कार करण्यापर्यंतचे काम केले. जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी भागातही त्यांनी विविध उपक्रम राबविले. काही वर्षांपासून त्या भाजपमध्ये सक्रिय झाल्या होत्या. आधी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आणि नंतर जिल्हा महामंत्री म्हणून त्यांनी पदभार सांभाळला. पण नगर परिषद निवडणुकीदरम्यान त्यांनी माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे नेतृत्व स्वीकारत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला. पक्षाने त्यांना महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विराजमान केले. पण राजकीय करिअर अत्युच्च पातळीवर पोहोचण्याआधीच काळाने त्यांना हिरावून नेले. त्यामुळे जिल्ह्याच्या सामाजिक-राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond