
अमरावती, 8 डिसेंबर (हिं.स.)। संक्रांतीपूर्वी लहान मुले आणि तरुणांमध्ये पतंग उडवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून, बंदी घातलेला चायना मांजा बेकायदेशीरपणे विकला जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे गंभीर दुखापती आणि मृत्यू होतात. अशा प्रकाराला लगाम लावण्यासाठी पोलिस चायना मांजी विक्रेत्यांवर बारील लक्ष ठेवण्यासाठी मोहिम सुरु करणार आहे.
संक्रांतीला आता एक महिना शिल्लक आहे. मात्र पतंग विक्री आधीच जोरात सुरू आहे. मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये उत्साह दिसून येत आहे. काही वर्षापूर्वी पतंग उडविण्यासाठी चायना मांजा बाजारात आला. मात्र त्याचे दुष्परिणाम तितकेच वेगाने झाले. चायना मांजामुळे अनेकांचे मृत्यू झाले तर अनेक जखमी झाले. ही बाब गांभीर्याने घेत चायना मांजाच्या विक्रीवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे असताना सुद्धा मांजाचा बेकायदेशीर व्यापार आणि खरेदी अजूनही सुरू आहे.
या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत शहरात १६ हून अधिक घटना घडल्या, ज्यामध्ये बडनेरा परिसरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कायदेशीर कारवाईत हजारो रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तथापि, संभाव्य प्राणघातक मांजाची विक्री पुन्हा एकदा सुरु झाल्याचे चित्र आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी, पोलिस विभागाने सर्व पोलिस ठाण्यांच्या संबंधित डीबी पथकांना कारवाई चे आदेश देण्यात आले आहेत.
खरेदी करणारे सुद्धा रडारवर
पोलिस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले की, शहरात कोणतीही घटना घडल्यास, बंदी घातलेल्या मांजाची विक्री करणारे देखील पोलिसांच्या रडारवर असतील. संबंधित पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी