
अमरावती, 8 डिसेंबर (हिं.स.) | भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अमरावती शहरात भव्य राज्यस्तरीय ‘हाफ मॅरेथॉन’ (अटल दौड) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि अमरावती जिल्हा अॅथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रतिष्ठित स्पर्धा २५ डिसेंबर रोजी होणार आहे.
या राज्यस्तरावरील स्पर्धेच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी विशेष मुख्य कार्यालयाचे उद्घाटन बडनेरा रोडवरील मंत्री मोटर्स समोर करण्यात आले. या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, तुषार भारतीय, शिवराय कुलकर्णी, रवींद्र खांडेकर, माजी महापौर चेतन गावंडे, गजानन कोल्हे, नितीन पोटे अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, अटल दौड आयोजित करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे समाजात आरोग्य, एकता आणि सकारात्मकतेचा संदेश पोहोचवणे. ही विशेष दौड अटलजींच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची आणि राष्ट्रनिर्माणाच्या आदर्शांची आठवण करण्यासाठी ठेवण्यात आली आहे.
याचवेळी शिवराय कुलकर्णी यांनी सांगितले की, या कार्यक्रमाचा उद्देश युवक आणि नागरिकांमध्ये फिटनेसविषयी जागरूकता निर्माण करणे, सामाजिक सहभाग वाढवणे आणि शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण करणे हा आहे. तुषार भारतीय म्हणाले, “अटलजींनी नेहमीच राष्ट्राच्या आरोग्यावर आणि युवा शक्तीवर विश्वास ठेवला. ही दौड त्यांच्या त्या विश्वासाला पुढे नेण्याचा छोटा प्रयत्न आहे.” त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
माजी महापौर चेतन गावंडे म्हणाले, “मॅरेथॉन ही फक्त खेळ स्पर्धा नसून समाजाला जोडणारी एक महत्त्वपूर्ण कडी आहे. ही स्पर्धा आपल्याला अनुशासन, संयम आणि टीम स्पिरिटची शिकवण देते. अटल दौडमध्ये वाढलेली सहभागिता ही अटलजींना खरी श्रद्धांजली ठरेल.” अटल दौड बाबत शहरात उत्साहाचे वातावरण असून आयोजकांकडून नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रम संचालन मंदार नानोटी , प्रस्थावित गजानन कोल्हे तर आभार प्रदर्शन प्रशांत शेगोकर यांनी केले . यावेळी शहरातील विविध संघटना प्रतिनिधी , भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी