
अमरावती, 8 डिसेंबर (हिं.स.)
शहरातील बीएसएनएलच्या अंडरग्राउंड केबल चोरी प्रकरणी अमरावती गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दिल्ली व उत्तर प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीतील तिघांना अटक केली आहे. तर चार साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या टोळीने महाराष्ट्रातील अमरावतीसह अहमदनगर, संभाजीनगर आणि लातूर येथेही अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.फिर्यादी मिलिंद नागे, ज्युनियर टेलिकॉम ऑफीसर (बीएसएनएल) यांनी १३ नोव्हेंबर रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत, १२ नोव्हेंबर रोजी जीनींग फॅक्टरी–शेगाव नाका रोडवरील मॅनहोल उघडे आढळले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ५ ते ६ जण केबल चोरी करत असल्याचे दिसून आले. तपासात ८०० व ४०० पेअर केबल प्रत्येकी ५५० मीटर, एकूण १३ लाख ३० हजार २१३ रुपयांचा माल चोरी झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाने गोपनीय माहिती व फुटेजच्या आधारे टोळीचा सुगावा लावला. गुन्ह्यात वापरलेल्या हायडा केनच्या मालकाला ताब्यात घेऊन पुढील माहिती मिळाल्यानंतर आरोपींची नावे निष्पन्न झाली. ७ डिसेंबर रोजी आरोपी अफझल खान (१९), नफीज अहमद (३२) व लालबहादूर राजपूत (२०) यांना वडाळी हायवे परिसरातून शिताफीने पकडण्यात आले.आरोपींकडून २ लाख रुपयांची रक्कम, चार मोबाईल (किंमत ५९ हजार) आणि यापूर्वी जप्त केलेली हायडा केन (किंमत १० लाख) असा एकूण १२ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपींना गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संदीप चव्हाण यांच्या पथकाने केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी