
अमरावती, 8 डिसेंबर (हिं.स.)।
महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी गांधी चौकातील वाहनतळाचा कंत्राटदार नुकताच बदलविण्यात आला. पूर्वी हा कंत्राट एकविरा देवी संस्थानकडे होता, मात्र आता तो कंत्राट त्याच प्रभागातील माजी नगरसेवकाच्या भावाला दिल्याची माहिती बाजार परवाना विभागाकडून देण्यात आली. त्याचा फायदा महापालिकेला होणार असून मनपाच्या वार्षिक उत्पन्नात वाढ होणार आहे. गांधी चौकातील । वाहनतळापासून मनपाला वार्षिक ४ लाख ५० हजार रुपये प्राप्त होतील.महानगरपालिकेला मालमत्ता करासोबत अनेक विभागाकडून वार्षिक उत्पन्न मिळते. त्यापैकी एक विभाग म्हणजे बाजार परवाना विभाग आहे. वार्षिक उत्पन्न वाढविण्यासाठी बाजार परवाना विभागाकडून तीन महिन्यापूर्वी गांधी चौकातील वाहनतळाची निविदा काढण्यात आली. १५ वर्षापासून हा कंत्राट एकविरा देवी संस्थानकडे होता. तेव्हा महापालिकेला नाममात्र ८० हजार रुपये वार्षिक उत्पन्न प्राप्त होत असायचे. आता मात्र निविदा काढून महापालिकेने जणू उत्पन्नात वाढ केली. निविदा प्रक्रियेत फक्त तीन जणांनी हिस्सा घेतला आणि तो कंत्राट त्याच प्रभागाचे माजी नगरसेवक यांच्या भावाला देण्यात आला. हा कंत्राट एकदम १० वर्षाकरिताच देण्यात आला. तसेच यासंदर्भात महापालिकेने जाहीरात प्रसिध्द करुन निविदा प्रक्रिया केली मात्र केवळ तीन जणांनीच या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला आणि मनपाने कंत्राटदारसुध्दा निश्चित केला. त्यामुळे या संपूर्ण निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेतले जात आहेत. विशेष म्हणजे या निविदा प्रक्रियेत एकविरा देवी संस्थानने सुध्दा सहभाग घेतला होता. तीन ते साडे तीन हजार स्केअर फुट खुला भुखंड असून ती जागा महापालिकेच्या मालकीची आहे. कॉर्नर पीस भूखंड असल्याने या ठिकाणी वाहनतळाला दोन द्वार आहे. त्यापैकी पूर्वकेडीलुद्वार हे बंद करण्यात आले असून उत्तर दिशेचा दरवाजा खुला आहे. निविदा प्रक्रियेनुसार जरी हा कंत्राट माजी नगरसेवकाच्या भावाला देण्यात आला असला तरी बाजार परवाना विभागानुसार हस्तांतरणाची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. या ठिकाणी फोर व्हीलर, टू व्हिलरच नव्हे तर ट्रॅव्हल्ससुध्दा पार्किंग करण्याची सुविधा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी