
गडचिरोली, 8 डिसेंबर (हिं.स.)
गडचिरोली जिल्ह्यातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याच्या अधिनस्थ काम करणाऱ्या एका परिचारिकेची वेतनवाढ रोखत तिच्याकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याने तणावग्रस्त परिचारिकेने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर सध्या गडचिरोलीत उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असल्याने तिचे बयान नोंदविल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.
सदर परिचारिकेच्या पतीने संबंधितांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून संबंधित डॅाक्टरकडून त्या परिचारिकेचा असा छळ सुरू होता. याच तणावात त्या परिचारिकेने 6 डिसेंबरच्या रात्री पती झोपी गेल्यानंतर तिने विषारी द्रव प्राशन केले. ही बाब निदर्शनास येताच पतीने आधी मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर गडचिरोलीत हलविले.
याप्रकरणी अद्याप प्रशासकीय स्तरावरून कारवाई झालेली नाही. मात्र परिचारिकेचे बयान झाल्यानंतर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond