
अमरावती, 8 डिसेंबर (हिं.स.)
मतदान केंद्रांच्या परिसरातील वाद, निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील अर्थकारण आणि आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या जिल्ह्यातील दोन नगरपरिषद व दोन नगरपंचायतींचा निकाल जिल्ह्याच्या आगामी 'राजकारणा'ची दिशा ठरवणारा राहणार आहे.सन २०२२ मध्ये राज्यातील राजकारणाने घेतलेल्या कलाटणीचे परिणाम जिल्ह्यातही जाणवले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही दोन गटांत विभागला. आता चार प्रमुख पक्ष शिंदेसेना, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि भाजप यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाग्य आजमावत आहेत. या निवडणुकीत त्यांच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांचे बलाबल ठरवणारे परिणाम दिसणार आहेत.राजकारणात स्वातंत्र्योत्तर काळापासून वरचढ असलेल्या काँग्रेसची ताकद किती आहे आणि शहरी मतदार भाजपला कितपत पसंती देतात, हेदेखील या निकालातून स्पष्ट होणार आहे. रणधुमाळी संपून सर्व उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी (दि.२) मतपेटीत बंद झाले आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपशी थेट सामन्याचे प्रयत्न याचे विविध अर्थ सध्या जिल्ह्यात लावले जात आहेत. यामुळे नगराध्यक्षांसह नगरसेवकांसाठी झालेल्या निवडणुकांचा निकाल आगामी राजकारणाची दिशा ठरवेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी