अधिवेशन कालावधी वाढवण्यावरून पटोलेंची मुख्यमंत्र्यांशी शाब्दीक चकमक
नागपूर,08 डिसेंबर (हिं.स.) : हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्यानंतर सभागृहात सरकारच्या कामकाजाच्या गतीवरून जोरदार चर्चा रंगली. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी सरकारवर “अनावश्यक घाईघाईन
अधिवेशन कालावधी वाढवण्यावरून पटोलेंची मुख्यमंत्र्यांशी शाब्दीक चकमक


नागपूर,08 डिसेंबर (हिं.स.) :

हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्यानंतर सभागृहात सरकारच्या कामकाजाच्या गतीवरून जोरदार चर्चा रंगली. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी सरकारवर “अनावश्यक घाईघाईने” अध्यादेश आणि पुरवणी मागण्या मांडत असल्याचा आरोप करत अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली.

पटोले म्हणाले की, कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर विषय आणल्याने सदस्यांना योग्य चर्चा करण्यास मर्यादा येत आहेत. त्यामुळे अधिवेशन काही दिवस वाढवून द्यावे, अशी त्यांनी मागणी केली.

यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटोले हे स्वतः विधानसभा पीठासीन अध्यक्ष राहिलेले असल्याची आठवण करून दिली. “अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या व अध्यादेश मांडले जाणे हा नियम आहे,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यानंतर दोघांमध्ये अधिवेशनाच्या कालावधीवरून वाद वाढला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकाळात अधिवेशन फक्त तीन-चार दिवसच चालत असे. त्यावर पटोले यांनी त्या काळात कोविड परिस्थिती होती, असे प्रत्युत्तर दिले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “इतर राज्यांत अधिवेशन जास्त दिवस चालले; तिथे कोरोना नव्हता काय?” असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

वाद पुढे वाढू नये म्हणून सभापतींनी हस्तक्षेप करत, “गरज पडल्यास अधिवेशन कालावधी वाढवण्याचा विचार केला जाईल,” असे सांगितले. त्यानंतर शोकप्रस्तावाची घोषणा करून चर्चा स्थगित करण्यात आली आणि वादाला तात्पुरता विराम मिळाला.----------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande