रत्नागिरी, 30 सप्टेंबर, (हिं. स.) : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या आदर्श वाचक आणि ग्रंथमित्र पुरस्कार वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात आमदार शेखर निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर मिलिंद कापडी, वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, उपाध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, सहकार्यवाह विनायक ओक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालिका स्वरदा कुलकर्णी यांनी केले. आमदार निकम यांचा सत्कार डॉ. जाधव यांच्या हस्ते, तर मिलिंद कापडी यांचा सत्कार कार्याध्यक्ष अरुण इंगवले यांच्या हस्ते करण्यात आला.
वाचनालयाचे मो. गो. कानडे आदर्शवाचक पुरस्कार ज्येष्ठ वाचक श्रीकांत फडके, ज्येष्ठ महिला वाचक सुलोचना खातू, वीणा सावंत यांना, तर द. पां. साने ग्रंथ मित्र पुरस्कार वैभव खेडेकर यांना देण्यात आला. सन्मानचिन्ह, रोख रक्कम, शाल आणि ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात सुलोचना खातू यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी १९९६पासून आजपर्यंत वाचलेल्या पुस्तकांची नोंद ठेवली असल्याचे सांगितले. आपणास बालवयातच केसरी, मराठा ही वर्तमानपत्रे आणि छोटी पुस्तके वाचनाचे संस्कार कुटुंबात झाले. इथल्या वाचनालयामध्ये अतिशय आपुलकीने ग्रंथ देवघेव केली जाते. पुरस्कारप्राप्त वाचकमित्रांच्या वतीने त्यांनी वाचनालयाचे आभार मानले.
वाचनालयाच्या ग्रंथपाल गौरी भोसले यांची कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे नागरी सहकारी पतसंस्थेत संचालिका म्हणून निवड झाल्याबद्दल शाल, पुस्तके देऊन आमदार निकम यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. गौरी भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना वाचनालयाच्या आदर्श वाचक निवडीचे निकष विशद केले.
याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, लेखक सुहास बारटक्के यांच्या नीतिमूल्यांच्या संस्कार कथा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. वाचनालायनेही त्यांचा विशेष सन्मान केला.
आमदार निकम यांनी पुरस्कार प्राप्त सर्वांचे अभिनंदन करून लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराबाबत गौरवोद्गार काढले. वाचनालय राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. ज्येष्ठ वाचकांचा सन्मान करण्याची संधी मिळाली हा मी माझा सन्मान समजतो, असे निकम यावेळी म्हणाले.
प्रा. डॉ. प्रतीक ओक यांनी पीएचडी मिळविल्याबद्दल त्यांचाही शाल, मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ओक यांचा परिचय संचालक अनिल धोंडे यांनी करून दिला. सत्काराच्या निमित्ताने वाचनालयाच्या वतीने डॉ. प्रतीक ओक यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन संचालिका मानसी पटवर्धन यांनी केले.
पुरस्कार सोहळ्यानंतर डॉ. प्रतीक ओक यांनी तंत्रज्ञानातून केलेले संशोधन या विषयावर स्लाइड शो दाखवून अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी