
रत्नागिरी, 10 जानेवारी, (हिं. स.) : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. डॉ. अश्विनी देवस्थळी यांना 'आधुनिक सावित्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि बारामतीतील महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र महाविद्यालयाने करिअर संसदेचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन बारामती येथे झाले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा अविरतपणे चालवून बदलत्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक प्रवाहाला अनुसरून समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये भरीव कामगिरी केलेल्या राज्यातील १९ महिलांना करिअर कट्टाच्या वतीने 'आधुनिक सावित्री २०२६' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बी. एम. एस. विभागाच्या प्रमुख डॉ. अश्विनी देवस्थळी यांचाही समावेश होता.
पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंटचे अध्यक्ष राजेंद्र पवार, यशदाचे उपमहासंचालक डॉ. शेखर गायकवाड, इंडियन रेल्वे पर्सोनेल सर्व्हिसेसचे तुशाबा शिंदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. देविदास वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी