अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान आयोजन
जळगाव, 10 जानेवारी (हिं.स.) जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. २८ जानेवारी ते रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान हा महोत्स
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान आयोजन


जळगाव, 10 जानेवारी (हिं.स.) जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. २८ जानेवारी ते रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सुचना एवं प्रसारण मंत्रालय, भारत सरकार व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल, कालिका स्टील व सॉलीटेअर टॉवर्स यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे.आजपर्यंतचे जागतिक दर्जाचे सर्वोत्त्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचावेत, चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणार्‍या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणिवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात, मराठवाडा व छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रोडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोहोचावे, छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांपर्यंत पोहोचावे, मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांच्यासोबत संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सव आयोजनामागे उद्देश आहे.महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक व एक लक्ष रूपये देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे.

भारतीय सिनेमा स्पर्धा गट ज्युरी समितीचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ध्वनी संयोजक, ऑस्कर पुरस्कार विजेते पद्मश्री रसूल पुकूट्टी (कोचीन) हे असणार आहेत. तर ज्युरी सदस्य म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक अनिरूध्द रॉय चौधरी (कोलकाता), ज्येष्ठ संकलक आरती बजाज (मुंबई), ज्येष्ठ छायाचित्रणकार राफे मेहमूद (मुंबई) व ज्येष्ठ पटकथा लेखक उर्मी जुवेकर (मुंबई) हे मान्यवर असणार आहेत.

फिप्रेसी ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. फिप्रेसी भारत हे जगभरातील महोत्सवांमधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करतात. त्या पुरस्कारांना आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जातो. त्यांचे तीन विशेष ज्युरी महोत्सवातील आताच्या पिढीतील ज्या दिग्दर्शकांच्या कारकिर्दीतील पहिले अथवा द्वितीय सिनेमे असणार आहेत त्यांचे विशेष परीक्षण करणार आहेत. या समितीचे ज्युरी अध्यक्ष ज्येष्ठ चित्रपट समीक्षक डॉ.सी.एस. व्यंकटीस्वरन (कोचीन) तर डॉ.मीनाक्षी दत्ता (दिब्रुगड) व एम.एम.व्हेट्टीकाड (नवी दिल्ली) हे मान्यवर या समितीत असणार आहेत.चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता रूक्मीणी सभागृह, एमजीएम परीसर, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रसंगी महोत्सवाचे मानद अध्यक्ष व प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर व ऑस्कर पुरस्कार विजेते प्रसिद्ध ध्वनी संयोजक पद्मश्री रसूल पुक्कूट्टी यांची उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मकदुम, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, कालिका स्टीलचे अरूण अग्रवाल, प्रोझोनचे सेंटर डायरेक्टर व वरिष्ठ उपाध्यक्ष कमल आर. सोनी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री ९ वा. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेला व सध्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत असलेली स्पॅनिश/फे्ंरच भाषेतील, ऑलिव्हर लॅक्से दिग्दर्शित चित्रपट सिराट महोत्सवाचा उद्घाटकीय चित्रपट म्हणून प्रदर्शित केला जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर पुढील चार दिवस महोत्सव आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होईल.

महोत्सवाचा समारोप सोहळा रविवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ५ वाजता आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे. प्रसिध्द दिग्दर्शक व निर्माते आनंद एल. राय व ऑस्कर विजेते साउंड डिझायनर रसूल पुक्कूट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सोहळा संपन्न होईल.

सुवर्ण कैलास पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप यंदाच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतील महत्वपूर्ण चित्रपट प्रसिध्द दिग्दर्शक जफर पनाही दिग्दर्शित इट वॉज जस्ट अ‍ॅन अ‍ॅक्सिडेंड (फारसी) दाखविण्यात येणार आहे.

महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत चित्रपट प्रदर्शनांबरोबरच विविध भरगच्च कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. गुरुवार, दि. २९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे ‘मंजूमल बॉइज’ या प्रसिध्द सिनेमाचे युवा दिग्दर्शक चिदंबरम यांच्या समवेत विशेष संवाद आयोजित करण्यात आलेला आहे. दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग हे या सत्राचे संवादक असतील. गुरूवार, दि. २९ जानेवारी २०२६ रोजी सायं ६ वा. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे ‘मराठी चित्रपटांचा बदलता चेहरा’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते आशिष बेंडे, ‘साबरबोंडं’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन कानवडे, चित्रपट निर्मात्या तन्मयी देव, फिल्मसिटीचे पंकज चव्हाण सहभागी होतील. चित्रपट समीक्षक व लेखक नम्रता फलके या सत्राच्या संवादक असतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande