
परभणी, 10 जानेवारी, (हिं.स.)। महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या काही संस्थाचालकांसह काही मातब्बर उमेदवारांनी त्यांच्याशी संलग्न असणार्या शैक्षणिक संस्था, बँका किंवा अन्य प्रतिष्ठानातील कर्मचार्यांना सकाळपासून रात्री उशीरापर्यंत प्रचारयुध्दात जुंपविले आहे.
महानगरपालिकेच्या निवडणूका अवघ्या पाच दिवसांवर येवून ठेपल्या आहे. त्या त्या प्रभागातील प्रचारयुध्द चांगलेच पेटले आहे. काही प्रभागात या प्रचारयुध्दाने कळस गाठला आहे. स्थानिक पातळीवरील नेतेमंडळी, प्रभागातील मातब्बर उमेदवार, त्यांचे कुटूंबिय, नातेगोते व कट्टर समर्थक जीवाचे रान करीत आहेत. त्यातच ‘साहेबाकरीता सारंकाही’ या हेतूने शैक्षणिक संस्थांसह बँका किंवा अन्य प्रतिष्ठाणातील अधिकारी-कर्मचारीसुध्दा या प्रचारयुध्दात पडद्याआड मोठ्या कसरती करीत जुंपले आहे. निवडणूकीतील आदर्श आचारसंहीतेचा तडाखा बसू नये, म्हणूनही हे कर्मचारी मोठी सावधगिरी बाळगत आहेत.
विशेषतः या प्रचारयुध्दात थेट प्रचार करण्याऐवजी पदयात्रा, रॅली वगैरेंमध्ये सहभाग नोंदविण्याऐवजी कर्मचार्यांचे हे गट त्या त्या भागात गल्लीबोळांमधून एक-दोन जणांचे गट करीत डोअर टू डोअर फिरु लागले आहेत. विरोधकांच्या दृष्टीस पडू नये म्हणून सकाळी लवकर किंवा सायंकाळच्या आत प्रचाराचं हे काम पध्दतशीरपणे आटोपली जात आहेत.
आपआपल्या संस्थांतर्गत दैनंदिन कामे आटोपून हे कर्मचारी दिलेल्या जबाबदारी प्रमाणे मोठ्या नेटाने एक एक वस्त्या पालथ्या घालण्याचे काम करीत आहेत. सर्वसामान्य मतदारांपर्यंत डोअर टू डोअर पोहोचून साहेबांनी केलेल्या कामांच्या आढावा पुस्तिका, संकल्पपत्र किंवा पक्षाचे जाहीरनामे मतदारांच्या हाती टिपवू लागले आहे. साहेबांचे गोडवेसुध्दा पध्दतशीरपणे हे कर्मचारी गाऊ लागले आहेत. साहेबांची धर्मनिरपेक्ष अशी प्रतिमा, साहेबांनी केलेल्या सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी व राजकीय क्षेत्रात सत्तेच्या माध्यमातून साहेबांनी केलेल्या समाजकार्याच्या कथाही ऐकवू लागले आहेत.
काही कर्मचारी वर्ग व शिक्षक हे त्या मतदारांचे संपर्क क्रमांक, मतदार यादीतील नावे, पान व मतदाराचा क्रमांक वगैरे तांत्रिक गोष्टीच्या नोंदी करीत संबंधितांपर्यंत त्या बाबी पोहचवू लागल्या आहेत. तर काही प्रभागात हे कर्मचारी वर्ग व शिक्षक हे व्यवस्थापनाचं काम पध्दतशीरपणे पार पाडीत आहेत. काही ठिकाणी दैनंदिन खर्चाच्या नोंद, दैनंदिन व्यवहारही या कर्मचार्यांद्वारे सांभाळल्या जावू लागले आहेत. महानगरपालिकेंतर्गत काही सेवानिवृत्त कर्मचारीही या निवडणूकीत आपआपल्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहीले आहेत. तेही मोठ्या हिमतीने फिरु लागले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis