अमरावतीत मतदान जनजागृती रॅली उत्साहात
अमरावती, 10 जानेवारी (हिं.स.) अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांमध्ये मतदानाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य मतदान ज
अमरावतीत भव्य मतदान जनजागृती रॅली उत्साहात संपन्न शंभर टक्के मतदानाच्या संकल्पासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग


अमरावती, 10 जानेवारी (हिं.स.) अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांमध्ये मतदानाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य मतदान जनजागृती रॅली शनिवार, दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध व शांततेत यशस्वीरीत्या पार पडली. लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा, मतदानाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीत शंभर टक्के मतदानाचे उद्दिष्ट साध्य व्हावे, या हेतूने सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. प्रशासनाच्या नियोजनानुसार दुपारी 3.00 वाजता दसरा मैदान येथून रॅलीला प्रारंभ झाला. दसरा मैदान → राजापेठ → राजकमल चौक असा रॅलीचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. या मतदान जनजागृती रॅलीत शहरातील विविध सामाजिक, व्यापारी, व्यावसायिक, औद्योगिक, शैक्षणिक तसेच स्वयंसेवी संघटनांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षकवर्ग, व्यापारी, उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. हातात फलक, बॅनर व घोषणांच्या माध्यमातून “मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार व कर्तव्य आहे”, “लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करा”, “माझे मत – माझा अधिकार” असे संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यात आले. रॅलीदरम्यान संपूर्ण मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी नागरिकांनी रॅलीचे स्वागत करून मतदानाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. प्रशासनाच्या वतीने निवडणूक प्रक्रियेचे महत्त्व, मतदानाचे फायदे तसेच लोकशाहीतील नागरिकांची भूमिका याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली. या रॅलीत मतदान जनजागृती गाण्याचे लाँचिंग, 100 फुट तिरंगा, तिरंगी फुगे सोडणे, जेवड शाळेजवळ पथनाट्य सादरीकरण तसेच रथावरील मतदान जनजागृती कार्यक्रम नागरिकांचे विशेष आकर्षण ठरले. सोशल मीडियावर मतदान जनजागृतीचा संदेश पोहोचावा यासाठी नागरिकांनी उत्साहाने सेल्फी उपक्रमात सहभाग नोंदविला. यावेळी दिव्यांग बांधवांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. मतदान जनजागृती गाण्याची निर्मिती उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या गाण्याचे गायन उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी केले असून गीतकार प्रो. डॉ. चंदू पखारे, संगीत व रचना राहुल तायडे, प्रिती तायडे व दिपाली पांडे यांचे आहे. रेकॉर्डींग आर.टी. इंटरटेंन्मेंट स्टुडिओ, अमरावती येथे करण्यात आले आहे. राजकमल चौक येथे रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर व प्रशासनाच्या प्रतिनिधींनी नागरिकांना कोणताही दबाव, प्रलोभन अथवा भीती न बाळगता निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच येत्या निवडणुकीत शंभर टक्के मतदानाचा संकल्प व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “लोकशाही ही प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागावर उभी आहे. मतदान हा केवळ अधिकार नसून प्रत्येक सुजाण नागरिकाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. प्रत्येक मत लोकशाही मजबूत करते. नागरिकांनी निर्भयपणे व विवेकबुद्धीने मतदान करावे.” सदर मतदान जनजागृती रॅलीमुळे शहरातील नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास अमरावती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, नरेंद्र वानखडे, दादाराव डोल्हारकर, स्वीप नोडल अधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, बाजार परवाना विभागाचे उदय चव्हाण, पशुशल्य चिकीत्सक डॉ. सचिन बोंद्रे, समाज कल्याण अधिकारी धनंजय शिंदे, शहर अभियंता रविंद्र पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, अग्निशमन अधिक्षक अजय पंधरे, उपअभियंता शरद तिनखेडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ, शाळा निरीक्षक योगेश पखाले, कैलाश कुलट, विजय खंडारे, ज्योती बनसोड, शुभांगी सुने, दुधे मॅडम, नलीनी रडके, भुषण बाळे यांनी परिश्रम घेतले. सदर रॅलीत महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande