
छत्रपती संभाजीनगर, 10 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या समोर 'ईव्हीएम' सील करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. सील केलेले 'ईव्हीएम' स्ट्राँगरुम मध्ये ठेवण्यात येणार आहेत.
'स्मार्ट सिटी' कार्यालयात पालिकेचे प्रशासक तथा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपायुक्त नवले, पालिकेचे उपायुक्त तथा निवडणूक विभाग प्रमुख विकास नवाळे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त ऋतुजा पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
'ईव्हीएम' सील करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. मतमोजणी केंद्रावर बसण्यासाठी जागेची मर्यादा आहे, त्यामुळे प्रत्येक नोंदणीकृत राजकीय पक्षाने प्रत्येक पॅनलसाठी एकच प्रतिनिधी नियुक्त करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारांना मतदानाच्या दिवशी दिवसभरात जास्तीत जास्त तीन वेळा मतदान केंद्रास भेट देता येणार आहे असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तीन मते होईपर्यंत त्यांना मतदान केंद्रात थांबता येईल. त्यांना अधिकवेळ मतदान केंद्रात थांबण्यास परवानगी असणार नाही असे जी. श्रीकांत यांनी बैठकी दरम्यान सांगितले. मतदान केंद्रात किंवा मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात कोणालाही मोबाइल फोन वापरता येणार नाही. या परिसरात कुणाकडे मोबाइल फोन आढळून आल्यास तो जप्त करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
अतिरिक्त पोलीस बंदोबस्त हवा असेल त्यांना तो पुरवण्यात येईल. निवडणूक काळात कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. आचारसंहितेच्या कालावधीत एअर बलून किंवा ड्रोनचा वापर पोलीसांच्या परवानगीशिवाय करु नये असे निर्देश पवार यांनी दिले.
'१४ जानेवारी रोजी मकर संक्रांत असून नायलॉन मांजाचा वापर कुणाही करु नये,' असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले. याच दिवशी विद्यापीठाचा नामविस्तारदिन साजरा केला जातो. यंदा आचारसंहितेच्या कारणामुळे नामविस्तारदिनाच्या कार्यक्रम स्थळी उमेदवाराचा किंवा राजकीय पक्षाचा प्रचारास, भेटवस्तूंचे आदानप्रदान करण्यास आणि राजकीय बॅनर्स लावण्यास बंदी असेल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis