डॉ संग्राम पाटील प्रकरणावर राष्ट्रवादीची सरकारवर टीका
अकोला, 10 जानेवारी (हिं.स.)। लंडनहून मुंबईत परतलेल्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर ‘लुक-आऊट सर्क्युलर’ (LOC) अंतर्गत चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्याच्या चौ
डॉ संग्राम पाटील प्रकरणावर राष्ट्रवादीची सरकारवर टीका


अकोला, 10 जानेवारी (हिं.स.)।

लंडनहून मुंबईत परतलेल्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर ‘लुक-आऊट सर्क्युलर’ (LOC) अंतर्गत चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर BNSS कलम 35(3) नुसार नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आले.

या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे. पक्षाचे प्रदेश संघटक सचिव जावेद ज़करिया यांनी भाजपवर लोकशाही दडपण्याचा गंभीर आरोप केला.

जावेद ज़करिया म्हणाले, “या देशात भाजपविरोधात बोलणे गुन्हा झाला आहे का? भाजपचे नेते कुणाबद्दलही काहीही बोलू शकतात, पण सरकारवर टीका करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई होते. ही नेमकी कोणती लोकशाही आहे?”

ज़करिया यांनी असा आरोपही केला की सोशल मीडियावर सरकारविरोधात मत व्यक्त केल्यामुळेच डॉ. पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली.

“विरोधी आवाज दाबण्यासाठी पोलिस यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. संविधान प्रत्येक नागरिकाला सरकारवर टीका करण्याचा अधिकार देते. पण आज परिस्थिती अशी झाली आहे की टीका केली तर केस, नोटीस आणि दहशत — मग लोकशाही कुठे उरली आहे?” असा सवाल त्यांनी केला.

डॉ. पाटील यांच्या विरोधात तक्रारदार निखिल भामरे (सोशल मीडिया सहसंयोजक, भाजपा महाराष्ट्र) यांनी फेसबुक पोस्टद्वारे राष्ट्रीय नेत्यांचा अवमान केल्याचा आणि समाजात द्वेष निर्माण केल्याचा आरोप दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले आहे. विरोधकांनी सरकारला थेट आव्हान दिल्याने आगामी दिवसांत वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande