
अकोला, 10 जानेवारी (हिं.स.)।
सोलापूरमध्ये केलेल्या कथित भडकाऊ आणि उत्तेजक विधानांप्रकरणी आमदार संग्राम अरुण जगताप यांच्याविरोधात दाखल झालेल्या फौजदारी तक्रारीवर येत्या सोमवारी, १२ जानेवारी २०२६ रोजी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे शहरासह राज्यातील राजकीय व कायदेशीर वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
समाजसेवक जावेद जकरिया यांनी वरिष्ठ फौजदारी अधिवक्ता अधि. नजीब शेख यांच्या माध्यमातून ही तक्रार दाखल केली असून न्यायालयाने ती फौजदारी MCA म्हणून स्वीकारली आहे.
याआधीच्या सुनावणीत माननीय न्यायाधीश श्री. एन. ए. शर्मा (पाचवे सह-न्यायाधीश) यांनी तक्रारदार जावेद जकरिया यांच्या विधानांचे व्हेरिफिकेशन पूर्ण केले होते.
येणाऱ्या सोमवारी होणाऱ्या सुनावणीत साक्षीदारांच्या बयानांची नोंद होण्याची अपेक्षा असून, या बयानांच्या आधारे पुढील न्यायालयीन कार्यवाही निश्चित होणार आहे.
दरम्यान, निवडणुकीचे तापलेले वातावरण आणि दुसरीकडे न्यायालयातील ही सुनावणी— या दोन्हीमुळे प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्वांच्या नजरा आता सोमवारच्या सुनावणीकडे लागल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे