
रायगड, 10 जानेवारी (हिं.स.)। भारत सरकारच्या “अमली पदार्थ मुक्त भारत” या अभियानाअंतर्गत ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेज, अलिबाग येथे अमली पदार्थ सेवन प्रतिबंधावर व्यापक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेज विधी सेवा समिती, जे.एस.एम. कॉलेज एन.एस.एस. विभाग व रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात मनोविकारतज्ज्ञ डॉ. अनिल अनंत डोंगरे यांनी अमली पदार्थांच्या वाढत्या वापरामुळे समाजासमोर निर्माण झालेल्या गंभीर समस्यांवर प्रकाश टाकला. व्यसन ही सवय नसून तो मानसिक आजार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तंबाखूजन्य पदार्थ—गुटखा, मशेरी, तपकीर, विडी व हुक्का—यांच्या सेवनामुळे तोंडाचा, घशाचा व फुफ्फुसांचा कर्करोग वाढत असल्याने ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.
मद्यपानाविषयी समाजात असलेले अनेक गैरसमज दूर करताना डॉ. डोंगरे यांनी मद्यसेवनामुळे यकृताचे आजार, मेंदूवर परिणाम व रक्ताभिसरणातील बिघाड होतो, असे नमूद केले. तणाव, बेरोजगारी, कौटुंबिक अडचणी तसेच मित्रमंडळींचा दबाव यामुळे तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय गांजा, भांग, हेरॉईन, ब्राऊन शुगर, एम.डी. व ई-सिगारेटसारख्या अमली पदार्थांचा वापर तरुणांमध्ये वाढत असून त्याचे परिणाम केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न राहता कुटुंब व समाजावरही होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. व्यसनाधीनतेमुळे कौटुंबिक हिंसाचार, चोरी व इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने कायदा व सुव्यवस्थेवरही त्याचा ताण पडत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात LADCS चे प्रमुख ॲड. चंद्रशेखर कामथे यांनी बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक पोक्सो कायदा, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक पॉश कायदा तसेच अमली पदार्थविरोधी NDPS कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. या जनजागृती कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके