
अकोला, 10 जानेवारी (हिं.स.)।
काँग्रेसचे नेते तसेच राज्यसभेचे खासदार इमरान प्रतापगढी यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारत छोडो आंदोलनाच्या काळात भाजपचे नेते आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या वतीने इंग्रजांना पत्र लिहून हे आंदोलन दडपून टाकण्याची मागणी करत होते, असा आरोप त्यांनी केला.आज भाजप सरकार लोकांशी जसा व्यवहार करत आहे, तसाच व्यवहार त्या काळात इंग्रज करत होते, असेही ते म्हणाले.
ज्या पद्धतीने इंग्रज घर तोडत होते, त्याच पद्धतीने आज भाजप सरकार घरे तोडत असल्याचा आरोप प्रतापगढी यांनी केला. उत्तराखंडमधील अंकिता भंडारी प्रकरणाचा उल्लेख करत, कोणत्या व्हीआयपी व्यक्तीला “ट्रीटमेंट” देण्यासाठी या तरुणीची हत्या करण्यात आली, हे भाजपने स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली. इंग्रजांची जी मानसिकता होती, तीच मानसिकता आज भाजपची असल्याचे ते म्हणाले.अंबरनाथमध्ये स्थानिक पातळीवर काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपसोबत युती केल्याचे समजताच काही क्षणांतच त्या सर्वांना पक्षातून निलंबित करण्यात आले, असे प्रतापगढी यांनी सांगितले. मात्र भाजप–एमआयएम युतीवर टीका झाल्यानंतर एमआयएमने पाठिंबा काढला असला, तरी अद्याप एमआयएमच्या उमेदवारांवर कारवाई का करण्यात आलेली नाही? त्यांना पक्षातून हकालपट्टी का नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या घरातून एमआयएमचा उमेदवार बाहेर पडतानाचा व्हिडीओ समोर आल्यामुळे आतापर्यंत लपलेल्या गोष्टी आता उघडपणे समोर येत असल्याचा दावाही त्यांनी केला.यावेळी त्यांनी एमआयएमवरही टोला लगावला,अकोला शहरात जातीय भेद न करता सर्वांगीण विकासासाठी निधी दिल्याचे सांगत, कोणीही येथे येवो, मतदार काँग्रेससोबतच असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी तीव्र निषेध केला असून, अशा हल्ल्याचे समर्थन काँग्रेस कधीही करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे