
अकोला, 10 जानेवारी (हिं.स.)।
महाराष्ट्रात सत्तेतील युती सरकारमुळे जनता त्रस्त झाली असल्याचा आरोप एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अकोल्यात प्रचारासाठी आयोजित सभेत केला आहे. निवडणुका आल्या की युतीतील पक्ष वेगवेगळे लढतात, मात्र निवडणुकीनंतर सत्तेसाठी सर्वजण एकत्र येतात आणि महाराष्ट्राच्या जनतेची गंमत करतात, अशी घणाघाती टीका ओवेसी यांनी केली. “मुंबईत बसून वडापाव आणि मलई खाणारे तिन्ही नेते आहेत अशा मिश्किल शैलीत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टोला लगावला.यावेळी ओवेसी यांनी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार इमरान प्रतापगढी यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. “जे स्वतः नगरसेवकाची निवडणूक जिंकू शकत नाहीत, ते मोठमोठ्या बाता करतात,” असे म्हणत त्यांनी बोचरी टीका केली.यावेळी ओवेसी यांनी जळगाव येथील हारून मौलाना यांचाही समाचार घेतला. काही दिवसांपूर्वी अकोल्यात हारून मौलाना यांनी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करत एमआयएमला विरोध केला होता.यावर प्रत्युत्तर देताना ओवेसी म्हणाले, “मी लैला आहे, माझ्याशी सर्वांना प्रेम आहे पण हारून यांनी माझ्या नांदीला लागू नये, असा सल्ला देत त्यांनी खोचक टिप्पणी केली.
अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनाही ओवेसी यांनी थेट आव्हान दिले. “मी जर मैदानात उतरलो, तर ते तुम्हाला महागात पडेल,”अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला. तसेच अकोल्यात २०२३ मध्ये झालेल्या दंगलींचा उल्लेख करत, “त्या वेळी काँग्रेसचा एकही पैलवान मैदानात दिसला नाही, सगळे पळ काढत होते,”असे म्हणत त्यांनी मिश्किल शैलीत टीका केली.
भाषणाच्या शेवटी ओवेसी यांनी आपल्या घरातील एक किस्साही सांगितला.“मी आईला नेहमी सांगतो, तुम्ही मला प्रवासाच्या महिन्यात जन्म दिला म्हणून मी सतत प्रवास करत असतो,”असे सांगत त्यांनी सभेत हशा पिकवला.ओवेसी यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.मुंबईच्या रेल्वेत बॉम्बस्फोट झाला. या घटनेत 11 मुसलमानांना पकडले गेले. 19 वर्षे ते लोक तुरुंगात होते. कोणाचे सरकार होते त्यावेळेस? काँग्रेस सत्तेत होती. हायकोर्टाने सांगितले हे 11 लोक बेकसुर आहेत. काय गुन्हा होता त्यांचा. मुंबई पोलिस मधल्या मुसलमानांना एटीएसने टॉर्चर केले. या अन्याय विरुद्ध तुम्हाला उभं राहावं लागेल असेही खासदार असदुद्दीन ओवैसी यावेळी म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे