
रायगड, 10 जानेवारी, (हिं.स.)। अलिबागच्या वैशिष्ट्यपूर्ण पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी रायगड जिल्हा कृषी विभागाने राबवलेल्या नियोजनाला यंदा मोठे यश मिळताना दिसत आहे. सध्या सुमारे अडीचशे हेक्टरवर मर्यादित असलेले पांढऱ्या कांद्याचे लागवड क्षेत्र यंदा वाढून थेट ४५० ते ५०० हेक्टरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे अलिबागचा औषधी गुणधर्मांनी समृद्ध व रुचकर चवीसाठी प्रसिद्ध पांढरा कांदा अधिक व्यापक बाजारपेठेत पोहोचणार आहे.
अलिबाग तालुक्यातील वेश्वी, वाडगाव, नेहुली, कार्ले, खंडाळे, पवेळे, रुळे, ढोलपाडा, सागाव व तळवली या मोजक्या गावांमध्येच आजवर पांढऱ्या कांद्याची शेती केली जात होती. या कांद्याला देशांतर्गत बाजारपेठेत मोठी मागणी असूनही उत्पादन कमी असल्याने मागणी पूर्ण होत नव्हती. परिणामी निर्यातक्षम असतानाही पांढरा कांदा परदेशी बाजारपेठेत पोहोचू शकत नव्हता. तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या पेटंट विभागाकडून अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन (GI) मिळाले. या मानांकनामुळे कांद्याच्या ब्रँडिंगला चालना मिळाली असून मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. हीच बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने पांढऱ्या कांद्याचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष बीजोत्पादन कार्यक्रम हाती घेतला.
या उपक्रमाअंतर्गत २८२ शेतकऱ्यांच्या सहभागातून २.३६ हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन करण्यात आले. त्यातून १ हजार ५३४ किलो दर्जेदार बियाणे उपलब्ध झाले असून ते इतर शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहे. सध्या अडीचशे हेक्टर क्षेत्रातून साधारण पाच हजार टन उत्पादन घेतले जाते. आगामी काळात हे क्षेत्र एक हजार हेक्टरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे.
भात कापणीनंतर जमिनीत शिल्लक राहणाऱ्या ओलाव्यावर नोव्हेंबर–डिसेंबर महिन्यात सेंद्रीय पद्धतीने पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. मिथाईल सल्फाइड, अमिनो अॅसिड व अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असल्याने हा कांदा कोलेस्ट्रॉल नियंत्रण, अॅनिमिया कमी करणे व पोटातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. “पांढऱ्या कांद्याचे उत्पादन वाढवण्यासाठी मागील वर्षी राबवलेल्या बीजोत्पादन कार्यक्रमामुळे यंदा लागवड क्षेत्रात निश्चितच वाढ होईल,” अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके