
अमरावती, 10 जानेवारी (हिं.स.) हिजाब प्रकरणावरून भाजप डॉ. अनिल बोंडे यांनी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार टीका केली असून यामुळे अमरावतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ओवैसी हे हिजाबच्या मुद्द्यावरून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बोंडे यांनी केला. डॉ. बोंडे म्हणाले की, इराणसारख्या देशात मुस्लिम महिलाच एकत्र येऊन हिजाबविरोधात आवाज उठवत आहेत. “मुस्लिम महिलांनाही हिजाब नको आहे. कोणालाही पारतंत्र्य नको, प्रत्येकाला स्वातंत्र्य हवे आहे,” असे ते म्हणाले. मात्र, ओवैसी भारतातील परिस्थितीबाबत अर्धसत्य मांडत असल्याचा आरोप त्यांनी केला. “भारतामध्ये लोकसंख्येचे प्रमाण असंतुलित होत आहे, हा गंभीर विषय आहे. मात्र, ओवैसी या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेत नाहीत,” असे सांगत बोंडे यांनी हिंदूंनी एकजूट होण्याचे आवाहन केले. “हिंदूंनी एकत्र राहिले तरच हिंदू या देशावर प्रभावीपणे राज्य करू शकतील,” असे वक्तव्य त्यांनी केले. या विधानांनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून हिजाब, लोकसंख्या आणि धार्मिक मुद्द्यांवरून पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी