
लातूर, 10 जानेवारी (हिं.स.)।
भाजपा सरकारने रशिया या देशामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारून कष्टकरी समाजाचा गौरव केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करत लंडनमधील घराचे जतन करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिसादन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वारस सचिन साठे यांनी केला.
लातूर शहरातील प्रभाग क्रमांक २ व ३ मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत साठे बोलत होते. या सभेस आ. अभिमन्यू पवार, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, रामचंद्र तिरुके, बापूसाहेब राठोड, संजय दोरवे, पंडीत सूर्यवंशी, बालाजी केंद्रे, प्रभाग २ मधील उमेदवार रवि सुडे, अमर पटेल, पुष्पा भडीकर व निर्मलाताई कांबळे तसेच प्रभाग क्रमांक ३ मधील उमेदवार सुनिता अवचारे, राजकुमार गोजमगुंडे, पे्रमा बिराजदार व सुनिल कांबळे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सचिन साठे म्हणाले की, भाजपा सरकारने देशातील सामान्य नागरिकांचे जीवन सुखी करण्यासाठी काम केले आहे. विकासाचा झंझावात करताना महापुरुषांचा सन्मानही राखला आहे. काँग्रेसने ७० वर्षाच्या सत्तेत गरिबांकडे पाहिले नाही. शेतकरी व कामागारांसाठी काम केले नाही. महापुरुषांच्या विचारांशी त्यांच्या देणे घेणे राहिले नाही. आता मात्र सत्ता गेल्यानंतर संविधान धोक्यात असल्याचे ते सांगत आहेत. भाजपा हाच संविधाचे रक्षण करणारा पक्ष आहे. लातूर शहरातही भाजपाने विकासकामे केली आहेत. भविष्यात लातूरचा विकास अधिक गतीने करण्यासाठी आपण भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis