
बीड, 10 जानेवारी (हिं.स.)। येथील सौ. के.एस.के. अन्नतंत्र व कृषी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ झाला. यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. उज्वल भविष्य घडवण्यासाठी योग्य दिशा निवडावी.
या कार्यक्रमात हैद्राबाद येथील राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या स्नेहा दुधाळ हिचा सत्कार झाला. आंतरविद्यापीठ महोत्सवात यश मिळवलेल्या वेदांत स्वामी, अमित दळवी, अभिजीत निकम यांचाही गौरव करण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान झाला. गीता परजने, वैष्णवी भोंडवे, श्रेया लांब, सुरेश घोडके, आशिष मळेकर यांचाही सत्कार झाला.
कार्यक्रमाला युवा नेते हर्षद क्षीरसागर, सहसचिव गोविंद साळुंके, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी. मोरे, अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. झेड.एच. सय्यद यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
माजी मंत्री क्षीरसागर म्हणाले, विद्यार्थ्यांनी अडचणींवर मात करत पुढे जावे. जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर यश नक्की मिळते. नव्या प्रयोगांचा अभ्यास करून यशाकडे वाटचाल करावी. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उच्च शिक्षणाची दिशा निवडली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला जमेल तो विषय आत्मसात करावा. कार्यक्रमाला दोन्ही महाविद्यालयांचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis