
अमरावती, 10 जानेवारी (हिं.स.)।
अमरावती महापालिका निवडणुकीचे रणमैदान दिवसेंदिवस तापत चालले असून, प्रभागनिहाय प्रचाराला प्रचंड वेग आला आहे. कमी कालावधीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी अक्षरशः स्वतःला झोकून दिले आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या प्रचारामुळे उमेदवारांची दिनचर्या ‘हाऊसफुल्ल’ झाली आहे.सकाळी लवकर पदयात्रेने प्रचाराला सुरुवात होत असून, घरोघरी भेटी देत थेट मतदारांशी संवाद साधला जात आहे. दुपारच्या सत्रात विविध बैठका, कार्यकर्त्यांच्या आढावा सभा घेतल्या जात आहेत. संध्याकाळनंतर पुन्हा पदयात्रा आणि रात्री उशिरापर्यंत मुख्य चौकांमध्ये कोपरासभांचा धडाका सुरू असतो. काही प्रभागांत मोठ्या नेत्यांच्या सभांच्याही तारखा निश्चित झाल्या असून, त्या दृष्टीने तयारीला वेग आला आहे.प्रचारासाठी उपलब्ध असलेला कालावधी मर्यादित असल्याने उमेदवारांनी अत्यंत नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा उभारली आहे. अनेक उमेदवारांनी अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली होती. त्याचा फायदा घेत त्यांनी आपापले प्रभाग अक्षरशः पिंजून काढले आहेत. सकाळी नऊ-दहा वाजता सुरू झालेला प्रचार अनेकदा मध्यरात्रीपर्यंत सुरू राहत आहे.प्रचारादरम्यान फटाक्यांची आतषबाजी हा एक महत्त्वाचा आकर्षणाचा भाग ठरत आहे. उमेदवाराच्या आगमनावेळी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडून जल्लोष केला जात असून, त्यामुळे वातावरण उत्साही आणि भारावलेले दिसून येते. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणे आणि मतदारांवर दृश्यात्मक प्रभाव टाकणे, या उद्देशाने हा प्रकार प्रभावी ठरत असल्याचे दिसते. अनेक ठिकाणी प्रचार रॅली म्हणजे जणू उत्सवाचेच स्वरूप धारण करताना दिसत आहे.घरोघरी जाऊन ज्येष्ठांचा आशीर्वादमहिला उमेदवारांनी प्रचारात वेगळीच पद्धत अवलंबली आहे. त्या स्वतःच्या निवडणूक चिन्हाचे पत्रक आणि तिळगूळ घेऊन महिलांशी संवाद साधत आहेत. “आमच्याकडे लक्ष असू द्या,” असे म्हणत त्या आपल्या चिन्हाची ओळख करून देत आहेत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने अनेक उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्यावर विशेष भर देत आहेत.महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे अमरावती शहरातील वातावरण पूर्णपणे राजकीय रंगात न्हाऊन निघाले आहे. तिळगूळ आणि भेटीगाठींचा हा प्रचार मतदारांच्या मनावर किती प्रभाव टाकतो आणि त्याचा प्रत्यक्ष मतदानावर कोणाला फायदा होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी