
चंद्रपूर, 10 जानेवारी (हिं.स.) :
खेळामध्ये यश-अपयशाची पर्वा न करता प्रत्येक मुलाने स्पर्धेत सहभागी व्हावे. खेळातूनच मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास होत असतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मैदानी खेळ तसेच कला-कौशल्ये जोपासण्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी केले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित चाचा नेहरू बालमहोत्सव 2025-26 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालविकास नागपूर विभागाचे उपायुक्त दत्तात्रय मुंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भागवत तांबे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. क्षमा बासरकर, सदस्य वनिता घुमे, ज्योत्स्ना मोहितकर, महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे, जिल्हा परिविक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपायुक्त दत्तात्रय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, स्पर्धांमध्ये यशाची अपेक्षा न ठेवता उत्साहाने सहभाग घ्यावा, असे सांगितले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विभागीय व राज्यस्तरावर संधी दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाअंतर्गत कार्यरत शासकीय व स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल अनाथ, निराधार, निराश्रित, काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके, विधी संघर्षग्रस्त बालके, बालसंगोपन योजनेचे लाभार्थी तसेच शाळांमधील सर्वसामान्य बालकांमध्ये बंधुभाव निर्माण व्हावा व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने 7 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमादरम्यान कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, बालकामगार, बालविवाह व बालशोषण प्रतिबंध विषयक स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. तसेच महिला व बालविकास विभागांतर्गत मिशन वात्सल्य, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन, मिशन शक्ती, महिला हेल्पलाईन 181, सखी वन स्टॉप सेंटर, शक्तिसदन, वर्किंग वूमन हॉस्टेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, बालसंगोपन योजना आदी योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
विद्यार्थ्यांचा मानसिक, शारीरिक व कौशल्यात्मक विकास व्हावा तसेच बालगृहातील मुलांमध्ये बाह्य स्पर्धांना सामोरे जाण्याचे धैर्य निर्माण व्हावे, या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी प्रास्ताविकातून दिली.
कार्यक्रमाचे संचालन कल्पना राजूरकर यांनी केले, तर आभार जिल्हा परिविक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे यांनी मानले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव