हरभरा पिकावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन
चंद्रपूर, 10 जानेवारी (हिं.स.) । हरभरा पिकामध्ये घाटेअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घाटेअळीचे प्रभावी नियं
हरभरा पिकावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन


चंद्रपूर, 10 जानेवारी (हिं.स.) । हरभरा पिकामध्ये घाटेअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घाटेअळीचे प्रभावी नियंत्रण कसे करावे याबाबत माहिती देण्यात आली आहे.

हरभरा पिकाचे नियमित व बारकाईने निरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. घाटेअळीची मादी पतंग पानांवर, कोवळ्या शेंड्यांवर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. खसखशीच्या दाण्याएवढ्या आकाराच्या या अंड्यांतून 2 ते 3 दिवसांत अळी बाहेर पडते. ही अळी पानांतील हरितद्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने पिवळसर-पांढरी पडून वाळतात. मोठ्या अळ्या कोवळी पाने, फुले व घाटे खाऊन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. एक अळी सरासरी 30 ते 40 घाट्यांचे नुकसान करते.

पिक फुलोऱ्यावर आल्यानंतर घाटेअळीचा प्रादुर्भाव अधिक वाढतो. मोठ्या अळ्या घाट्यांना छिद्र पाडून आतील दाणे खात असल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होतो.

एकात्मिक व्यवस्थापन उपाययोजना :

घाटेअळी नियंत्रणासाठी नैसर्गिक शत्रूंचा वापर महत्त्वाचा आहे. बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी यांसारखे पक्षी अळ्या वेचून त्यांचे नियंत्रण करतात. त्यामुळे अवाजवी कीटकनाशक फवारणी टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी बांबूचे त्रिकोणी काठे (प्रति हेक्टर 20) उभारावेत. तसेच घाटेअळीच्या नर पतंगांचे नियंत्रण करण्यासाठी कामगंध सापळे (हेक्झाल्यूर) वापरावेत. एकरी दोन किंवा हेक्टरला पाच सापळे लावावेत. सापळ्यात सलग तीन दिवस 8 ते 10 पतंग आढळल्यास पुढील नियंत्रण उपाय करावेत.पिकात 40 टक्के फुलोरा आल्यास किंवा प्रादुर्भाव आढळल्यास दोन टप्प्यांत फवारणी करावी.

पहिली फवारणी (50 टक्के फुलोऱ्यावर):

निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एच.ए.एन.पी.व्ही. (1×10⁹ पीओबी/मि.ली.) 500 लिटर पाणी प्रति हेक्टर किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के ई.सी. 20 मिली.

दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी):

इमेक्टीन बेंझोएट 5 टक्के एस.जी. 3 ग्रॅम किंवा

ईऑन 50 टक्के ई.सी. 25 मिली किंवा

क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 टक्के एस.सी. 2.5 मिली.

घाटेअळीचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन केल्यास प्रादुर्भाव प्रभावीपणे नियंत्रणात आणता येईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande