
पुणे, 10 जानेवारी (हिं.स.)। जानेवारी महिना सुरू झाला की, आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसू लागतात. मात्र, दुसऱ्याचा पतंग कापणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात असल्याने अनेक जण धोकादायक आणि बंदी असलेला नायलॉन मांजा वापरण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. हाच नायलॉन मांजा सध्या पक्ष्यांसाठी आणि नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. नायलॉन मांजाच्या विक्रीवर व वापरावर कडक बंदी घातलेली असतानाही, पुण्यात अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने या घातक मांजाची विक्री होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
नायलॉन मांजावर बंदी असल्याची पूर्ण कल्पना असूनही, साधारण एक हजार रुपये खर्चून एका बंडलची खरेदी छुप्या मार्गाने केली जात आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या कारवाईची भीती असल्याने हा व्यवहार अत्यंत गुप्तपणे पार पडत असला, तरी शहरातील गल्लीबोळांतील अनेक व्यापाऱ्यांनी या घातक मांजाची उपलब्धता कायम ठेवली आहे. कोणत्याही कारवाईचा धाक उरला नसल्याने, बंदी असलेला हा ‘चिनी मांजा’ आजही सहजपणे मुलांच्या हातापर्यंत पोहोचत असल्याचे भयावह वास्तव उघड झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु