
रायगड, 10 जानेवारी (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील पत्रकारांची एकमेव नोंदणीकृत संघटना असलेल्या कर्जत प्रेस असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण बैठक शनिवारी रोजी शासकीय विश्रामगृह, कर्जत येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली.
या बैठकीत संघटनेच्या मागील वर्षातील कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी काळातील ध्येयधोरणे निश्चित करण्यात आली. पत्रकारांच्या व्यावसायिक अडचणी, संरक्षण, मान-सन्मान तसेच संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा झाली. पत्रकारिता अधिक सक्षम, संघटित आणि लोकाभिमुख कशी करता येईल, यावर सदस्यांनी आपली मते मांडली.
यावेळी संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाअंतर्गत पत्रकारांसाठी विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदान, सामाजिक बांधिलकी आणि निर्भीड लेखन यासाठी उत्कृष्ट पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
तसेच कर्जत तालुक्यातील पत्रकारांच्या हितासाठी विविध प्रशिक्षण कार्यशाळा, संवाद मेळावे, प्रशासनाशी समन्वय बैठक तसेच आपत्कालीन परिस्थितीत पत्रकारांना सहाय्य करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात आला. संघटनेने आगामी काळात पत्रकारांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात संपन्न झाली असून, पत्रकारांमध्ये संघटनेबाबत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके