मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे रायगड जिल्ह्यात घरपट्टी वसुलीत लक्षणीय वाढ
रायगड, 10 जानेवारी (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची रायगड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्ग
चार महिन्यांत 90.77 कोटींची घरपट्टी वसुली; रायगड जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी


रायगड, 10 जानेवारी (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची रायगड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीत मोठी वाढ झाली आहे.

अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सप्टेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत जिल्ह्यात तब्बल 90 कोटी 77 लाख रुपयांची घरपट्टी वसुली करण्यात आली आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याने अभियानांतर्गत विशेष उपाययोजना राबविण्यात आल्या. त्यानुसार सोमवार व शनिवारी घरपट्टी भरण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या होत्या. या कॅम्पला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेक थकबाकीदारांनी घरपट्टी भरली.

अभियान कालावधीत 13 डिसेंबर रोजी आयोजित लोकअदालतीमुळे अनेक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून घरपट्टीची 27 हजार 341 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 8 हजार 316 प्रकरणांचा निपटारा होऊन 6 कोटी 80 लाख 14 हजार 963 रुपयांची वसुली झाली.

घरपट्टीसह पाणीपट्टी वसुलीतही लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत पाणीपट्टीची 50.56 टक्के वसुली झाली असून सुमारे 9 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. लोकअदालतीत पाणीपट्टीची 6 हजार 689 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 474 प्रकरणांचा निपटारा होऊन 1 कोटी 14 लाख 41 हजार 550 रुपयांची वसुली करण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सांगितले की, या अभियानाची मुदत 31 मार्चपर्यंत वाढविण्यात आली असून आर्थिक वर्ष अखेरपर्यंत घरपट्टी वसुली 90 टक्क्यांपर्यंत नेण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे. वाढीव वसुलीमुळे ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन मूलभूत सुविधा व विकासकामे अधिक प्रभावीपणे राबविता येणार आहेत.

-------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande