
पुणे, 10 जानेवारी, (हिं.स.)। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठबळ देण्याच्या उद्देशाने इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने ‘इनोव्हेट यू टेकॅथॉन ३.० – २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनचे आयोजन २१ आणि २२ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले असून, या हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही स्पर्धा ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयओआयटी) महाविद्यालयात होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपाय शोधून त्याचे सोल्युशन समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती इनोव्हेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी शुक्रवारी दिली.
इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत यादव बोलत होते. यंदा हॅकेथॉनचे तिसरे वर्ष असून, दरवर्षी स्पर्धा अधिक मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येत आहे. गेल्या वर्षी हॅकेथॉनमध्ये देशातील नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ४०० पेक्षा अधिक महाविद्यालयांच्या संघाने सहभाग घेतला होता. हॅकेथॉनचेमधील विजेत्यांसाठी गटनिहाय लाखो रुपयांची रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार असून, सर्वाधिक नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी प्रकल्पासाठी इनोव्हेशन अवॉर्ड देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी व कल्पक वापर करणाऱ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन दिले जाणार आहे, असे यादव यांनी सांगितले.
यादव म्हणाले, ही राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉन पुण्यातील आयओआयटी महाविद्यालयात येथे होणार आहे. या हॅकेथॉनची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, देशभरातील विद्यार्थी या हॅकेथॉनमध्ये सहभागी होऊ शकतात. या उपक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, तंत्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आयडीटीआर, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे; तसेच सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ यांचा पाठिंबा लाभला आहे. विद्यार्थ्यांनी हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी इनोव्हेशन फाउंडेशनच्याinnovateyou.inया लिंकवर संपर्क करून, आपली माहिती आणि शुल्क भरून ५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करायची आहे. नोंदणी केलेल्या स्पर्धकांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. नोंदणी करताना अडचणी आल्यास विद्यार्थी +91 83900 38371 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी हॅकेथॉनमध्ये सहभागी व्हावे; तसेच प्राध्यापक आणि प्राचार्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन कल्पेश यादव यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु