
जळगाव, 10 जानेवारी (हिं.स.) | राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी मोहीम सध्या सुरु आहे. राज्याच्या सक्षमीकरण विभागाच्या आदेशाने ही मोहीम सुरु असून या तपासणीत जळगाव जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील दोघा कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी या कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.
पाचोरा पंचायत समितीत कार्यरत असलेले वरिष्ठ लेखा सहायक विक्रम सुरेश पाटील आणि धरणगाव पंचायत समितीत कार्यरत असलेले कनिष्ठ लेखा सहायक संतोष लक्ष्मण पाटील अशी निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या दोघा कर्मचाऱ्यांची पुनर्तपासणी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आली होती. अद्याप 62 दिव्यांग कर्मचाऱ्यांनी युआयडी सादर केलेले नसून त्यांना पडताळणीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर