
लातूर, 10 जानेवारी (हिं.स.)।
सामान्य नागरिकांना केवळ पोकळ आश्वासने नको तर ठोस विकास हवा आहे. केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारने मागील ११ वर्षांत केलेली ऐतिहासिक विकासकामे जनतेने अनुभवली आहेत. याच विकासकामांच्या जोरावर सर्वसामान्य लातूरकरांचा भाजपावर दृढ विश्वास असून, या निवडणुकीत भाजपाचे सर्व उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला.
शहरातील प्रभाग क्रमांक १, २, ३, ४, ७ व ८ मधील भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख आणि बुथ प्रमुखांची महत्वपूर्ण बैठक स्वामी विवेकानंद चौकातील पक्ष कार्यालय व वीरशैव भवन येथे पार पडली. याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा; निलंगेकरांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
या बैठकीत अरविंद पाटील निलंगेकर यांनी प्रभागांमधील जनसंपर्काचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, आज जनतेची साथ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला आहे. आता आपली जबाबदारी ही आहे की, मतदानादिवशी प्रत्येक मतदाराला घराबाहेर काढून मतदानासाठी प्रेरित करणे. एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता कार्यकर्त्यांनी घ्यावी.
पक्षाची ताकद वाढली: अपक्ष उमेदवाराचा भाजपात प्रवेश
या बैठकीचे विशेष आकर्षण म्हणजे प्रभाग क्रमांक ३ मधील अपक्ष उमेदवार सौ. शामा दिलीप गोखले यांनी भाजपाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून पक्षात जाहीर प्रवेश केला. अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, ज्यामुळे या प्रभागात भाजपाची बाजू अधिक भक्कम झाली आहे.
दिग्गजांची उपस्थिती
या बैठकीस माजी जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, शैलेश गोजमगुंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, माजी सदस्य बापूराव राठोड, बाजार समितीचे सभापती गोविंद चिलकुरे, नागेश जीवने, प्रदीप मोरे, सुमित दुरुगकर, प्रमोद गुडे, विशाल गायकवाड यांच्यासह भाजपाचे सर्व उमेदवार आणि शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis