
लातूर, 10 जानेवारी (हिं.स.)।
लातूरचा निर्धार: काँग्रेस-वंचित आघाडीचाच विजय!
अमित देशमुखांची तोफ धडाडली;
महायुतीच्या 'बाहेरच्या' नेत्यांना दिला सज्जड इशारा!
लातूर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, शहरात राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त प्रचाराने मोठी आघाडी घेतली आहे. प्रभाग १४, १५ आणि १७ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत जनसागराचा महापूर लोटला होता. ज्यांनी लातूरचे लचके तोडले, त्यांना आता लातूरकर धडा शिकवतील, अशा शब्दांत आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
सभेतील गाजलेले मुद्दे:
सामान्य माणसाला संधी: वारसाहक्कापेक्षा सामान्य कार्यकर्त्याला आणि सुशिक्षित तरुणांना उमेदवारी देऊन काँग्रेस-वंचित आघाडीने निवडणुकीत 'किंगमेकर' ठरण्याचे संकेत दिले आहेत.
अमित देशमुखांचा घणाघात: राज्यातील महायुती सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे. लातुरात अमली पदार्थांची विक्री वाढली आहे, गृहखाते काय करतेय? अनधिकृत युनिपोल उभे करणारे कंत्राटदारच निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांना जनता कदापि निवडून देणार नाही.
विकासाचा वारसा: स्व. विलासराव देशमुख यांनी शहरासाठी केलेली दूरदृष्टीची कामे आणि स्व. एस. आर. देशमुख यांचा निस्वार्थी सेवेचा वारसा सांगत, ही निवडणूक लातूरच्या अस्मितेची असल्याचे त्यांनी नमूद केले.
डिजिटल लातूरचा संकल्प: खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून 'डिजिटल वाहतूक नियंत्रण प्रणाली' राबवण्याचे आश्वासन दिले.
आम्ही कोविड काळात जनतेची सेवा केली, पाणी टंचाईत टँकर पोहोचवले. जे लोक महापालिकेच्या जागा गिळंकृत करायला पाहतायत, त्यांच्या विरोधात ही वैचारिक लढाई आहे.
— आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रतिपादन केले
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis