
ही निवडणूक उमेदवार नव्हे परभणीकरांचे भविष्य ठरविणारी
परभणी, 10 जानेवारी (हिं.स.)।
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार किंवा जिल्ह्याच्या पालकमंत्री यांचे भवितव्य निश्चित करणार्या नाहीत तर परभणीकरांचे भविष्य ठरविणार्या आहेत. त्यामुळे भाजपाचं कमळ हे केंद्र व राज्य पुरस्कृत गोरगरीबांसह अन्य नागरीकांच्या 124 कल्याणकारी योजनाचं चिन्ह आहे, हे ओळखून परभणीकरांनी भाजपाच्या पाठीशी भक्कमपणे ताकद उभी करावी, असे आवाहन राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
महसुलमंत्री बावनकुळे यांनी निवडणूक प्रचारार्थ परभणीतील कारेगांव रस्त्यावरील उघडा महादेव मंदिर कॉर्नरसह अन्यत्र प्रचारसभा घेतल्या. त्यातून बावनकुळे यांनी या निवडणूकांचे महत्व समजावून सांगितले. या निवडणूका सर्वार्थाने महत्वपूर्ण आहेत. या निवडणूकांतून उमेदवारांचे किंवा पालकमंत्र्यांचे किंवा आमचे नशीब ठरणार नाही तर या निवडणूकांमुळे परभणीकरांचे नशीब बदलणार आहे, त्यामुळे जागरुक परभणीकरांनी भाजपासारख्या विकासाभिमुख पक्षाच्या पाठीशी भक्कम ताकद उभी करावी, असे आवाहन केले.
केंद्र पुरस्कृत जनहिताच्या 55 योजना आहेत. तर राज्य पुरस्कृत 48 योजना आहेत. पालकमंत्र्यांच्या विशेष अधिकारातून म्हणजे डिपीडीसीच्या माध्यमातून 22 योजना आहे. अशा एकूण 124 योजना महापालिकेच्या माध्यमातून परभणी सारख्या महानगरात प्रभावीपणे राबविल्या जावू शकतात, या योजना गोरगरीब, उपेक्षित, निराधार, परितक्त्या, विधवा यांच्यासह शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरीकांच्या जीवनात परिवर्तन आणणार्या आहेत. महापालिकेच्या माध्यमातून, सदस्यांच्या माध्यमातून या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावनी सुरु झाल्यास निश्चितच आमूलाग्र असा बदल दिसून येईल, त्यामुळेच या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याकरीता परभणीकरांनी आपलं भविष्य ओळखून भाजपाच्या पाठीशी ताकद उभारावी, असे ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis